Sunday, January 20, 2019

उंची

उंची
एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर काय-काय कल्पना कराव्या लागतात. ह्या नुसत्या कल्पनेनंच हुरळून जायला होतं. उंची आठविण्यापेक्षा खोली आठवण्याचाच प्रयत्न होतो. पाण्याचं प्रतिबिंब पाहताना पाण्यात डोकावून पाहण्याची आवश्यकता नसते तर (स्व) अंतरंगात डोकावण्याची असते. कल्पनेला किंमत असते. पण केव्हा? जेव्हा कल्पना तितकीच जीवंत असते तेव्हाच. ‘त्या’ (विशिष्ट) उंचीवरून सर्वांची मतं स्वीकारता येत नसतात अन लाथाडताहि येत नाहीत. उंचीचा उगम हा मनातूनच व्हावयाचा असतो. अन्यथा तिचं (उंचीचं) मूळ आणि कूळ विचारण्याचा विफल प्रयत्न केला जातो.
उंची म्हणजे श्रीमंती, श्रीमंती म्हणजे उंची नव्हे. पण हे नक्की! उंची म्हणजे कर्तृत्व आणि कर्तृत्व म्हणजे उंची. आदरभाव आणि स्वभाव ह्या (एका) नाण्याच्या दोन बाजू होताना चांगलंच वाटतं. पण वास्तविकतेत ती दोन स्वतंत्र नाणीच होऊन जातात. निचभाव मनात ण येणे, तुच्छतेचे काळे-कभिन्न ढग मनाला कधीच न शिवावे हाच खरा (खऱ्या) उंचीचा अर्थ आणि सर्वार्थ असावा. अपेक्षांपेक्षा उत्कर्षाची सलामी आणि नाबाद यश, त्यासाठी काठोकाठ (आटोकाट) प्रयत्न करावेत आणि यथार्थ वाचन (reading) जाणून घेण्यासाठी मनाचा दगड (माझ्या मना बन दगड ..!) करून अंतरंगात सोडवा (पाण्यात नाही!). जे ‘निदान’ व्हायचं ते होईल. भार जास्त की बल जास्त? याचाही (निदान) विचार होईल. अंतरीचा शामल दोर जर पिळवटला जात असेल व त्याची जाण आपणांस होत असेल तर ‘प्रयोग’ तिथंच थांबवावा. अन्यथा मोतीकण समजलं जाणारं ज्ञान हे केवळ पाण्याचा बुडबुडा ठरेल! प्लावक आणि आर्किमिडीज फक्त शब्दप्रामाण्य नसेल (तसं ते नसावं ही!) तर ते विचारशील आणि सत्याच्या म्हणजेच ‘त्या’च्या (ईश्वराच्या) जवळ नेणारं जगतेपणीचं दृश्य (स्वप्न) ठरेल. ‘विन्ची’कडे गहनतेची उंची होती, ‘चिंविं’कडे हस्योपचाराची उंची होती. ‘विंदां’कडे तत्त्वप्रचुर काव्याची उंची होती. तर बाबांकडे ‘साधनेची’ आणि कार्याची उंची होती. त्यामुळे फक्त पायाजवळ पाहण्याची वृत्ती (आणि आवृत्तीही!) न ठेवता, भुवयांचे उंचावटे (आश्चर्यानं!) सुस्पष्टपणे अन रेखीवपणे टिपता येतील अशी प्रेरणादायी सुरुवात (सलामी) आणि धनात्मक तपदील व्हावा एवढीच उंची (अपेक्षा नव्हे!) ठेवावी.
२८/०१/२०११
शेवगाव

No comments:

Post a Comment