Thursday, August 20, 2026

खिडकी १/२

 खिडकी

[१]

(रेल्वेचा आवाज)

ते दूरचे मनोरे किती लहान दिसतायत. अगदी काडीपेटीतल्या काड्या वाटाव्यात तसं त्या मनोऱ्यांचं आहे. त्यापेक्षा ही झाडं जास्त मोठी वाटतात. कधी कधी तर काहीच दिसत नाही अशी परिस्थिती. जोराचा पाऊस पडत असताना तरी काय दिसायचं म्हणा?



आपल्या स्वप्नांचंही तसंच आहे. एक तर आपण तिथं पोहचू की नाही ह्याची गॅरंटी नसते. आणि इथूनच ती स्वप्नं ठेंगू वाटत असली तर जवळूनही काय डोंबल्याची असतील हाही एक पेच आहे. 


केवळ शौक म्हणून लाल टोपीवाल्यांच्या गोळींनी धाडकन कोसळलेल्या कैक रानम्हशी...

त्यांचा रानोमाळ तीव्र असह्य होत जाणारा दर्प... केवळ शौक म्हणून कुणी कसं काय एखाद्याचा जीव घेऊ शकतं?


मिटरलेस ओळींतला निसर्गाचा मोकळा श्वास ह्या कोलाहलात तग धरू शकेल? 

तसंही आपल्या प्राणप्रिय स्वप्नांना आपण घट्टपणे कवटाळून बसू नये यासाठी नवनव्या योजना लॉन्च केल्या आहेतच की... अगदी बेमालूमपणे सक्तीच्या रजेवर पाठवणूक केलीये आपल्या स्वप्नांची. 

आधीच ढेंगणी वाटणारी स्वप्नं एकदम आपल्या स्मृतींतून गुडूपच कशी होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. एकदम करेक्ट कार्यक्रम! 

आपल्या भग्नतेचे अवशेष पाहत अगदी आनंदानं उरलेला प्रवास पूर्ण करण्याचीच तर ही सोय नसावी? 

‘जांभळं खुडायला या’ असा आश्वासक स्वर कुठूनतरी कानांवर धडकल्याचा भास होतोय हल्ली... 

किंवा मग आपल्याला नुसतंच ‘राहून जा आज इथंच’ आणि आपसांत 'काय रं?’ हे सुचवू पाहणाऱ्या टिक पडलेल्या बोथट नजरा... 

आपण हे थोपवू शकत नाहीच... 

हे आपल्या गळी उतरवतीलच भयंकर असुरी बाळगून असलेले बिन धडाचे निरो. एकूणच काय तर ह्यांचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय.

जसं ही पळती झाडं, धावता अवकाश, विस्कटलेल्या झोपड्या, समाधानी सदरे मागे मागे पडत आहेत ह्या पोलादी घोड्या बरोबरच्या शर्यतीत!

मुळात ह्यांना उगाचंच दळलं जातंय. विनाकारण भरडलं जातंय. पिसलं जातंय. 

इक्विटी आणि इक्वालिटी यातला फरक तरी कुणी समजून घेईल तर शप्पथ!

जमिनीशी घट्ट नाळ जोडून असलेल्या ह्या पिढ्यांना सर्वकालिक पिछाडीवर असल्याचा कॉम्प्लेक्स तर अजिबातच नाहीये. पण निदान त्यांच्या माघारी ही शुद्ध बुद्ध काया, ही जगण्याची आणि जगवण्याची आस कायम ठेवणारी नैसर्गिक फुप्फुसं, जीवनदायिनी प्रवाह, खळाळते झरे, आम्ही आहोत ही पाठराखण करणारी पर्वतराई, आणि आंदानातल्या उभ्या समयीतली आस जागरूक ठेवणारी स्वप्नं राहोत शाबूत. ही गोडुस स्वप्नं राहोत शाबूत. 

•••••



[२]

तू नेहमीसारखी न बोलता

आपणहून काहीतरीच 

भरडल्यासारखं

वाचत राहिलीस माझं पत्र

ओठांनी

सातत्य डावलून.


हा ठिपक्यांचा उजेड 

आपण दोघांनी मिळून 

नेहमीसारखाच वळवला होता

आपल्या स्वप्नांच्या प्रदेशातून.


मी संकोच टाळत

नाकारल्या,

एका पाठोपाठ एक 

तुला न आवडणाऱ्या 

बऱ्याच गोष्टी...


पण,

नाकारू शकलो नाहीच

तुझ्या डोळ्यांतलं 

छद्मी रहस्य.


बघ –

हा बिनपायांचा उजेड 

कसा उतरू लागलाय 

आता 

कितीदा तरी चाचपडत असताना, 

मतप्रवाहाच्या ओघात अडकलेले

मला न आकळणारे

एकसारख्या चाकोरीतले

रस्ते...


हे न उमटलेले ठसे

प्रश्नांचे की 

आभासी वळणांच्या 

उत्तरांचे?


तसे तर हे 

आपल्या दोघांच्याही 

सावल्यांचे कट–आउट्स

वाटावेत

इतके तंतोतंत 

निळे सावळे,

प्राणांहूनही प्रिय!


माझ्या पत्रातला मजकूर

उमटायच्या आत

विझो

ही लाल बत्ती!


– शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर






Saturday, February 10, 2024

साऊ!

 



साऊ!


तुझ्या प्रत्येक कृतीयुक्त

पावलाबरोबरच

इथल्या कर्ममठ्ठ

सुधारणावाद्यांना मोहळ डसले 

जागोजागी

म्हणून पावलो पावली

तुला नामोहरम करण्याचे 

त्यांनी आचारले होते कुव्रत,

रचले होते कुभांड...


भीती! 

भीती तर तुला मुळात माहीतच नव्हती

माहीत होती गरिमा 

ज्ञानमंत्र फुंकण्याची 

पिचलेल्या आणि लाथाडलेल्या

पददलित सर्वहारांच्या कानात

एव्हढंच नाही तर 

बहिष्कृत आणि गिधाडी मानसिकतेच्या 

बळी पडलेल्या कित्येक अग्रहारींच्याही!


कारण तुझ्या भाळी होतं रेखीव चंद्रकोर

सौभाग्य आणि पिढी दर पिढी दरम्यान

ख्वाडा घालणाऱ्या कुव्यवस्थेला 'आडवं'

पाडण्याचं सामर्थ्य!


'क्रांतीज्योती' 

क्रांतीचं बाळकडू आणि ज्योतीचं वरदान

लाभलेली माय! तू तर आमची आदिमाय,

आमची आज्जी, पणजी

बहीण, मुलगी आणि इतरही

कित्येक कित्येक रुपात नित्यनूतन

भेटतेस!


यम-नियम न पाळणाऱ्या 

पत्थरांशी

झुंज देणारे तुम्ही दोघे बी

साक्षात

विठ्ठल-रखुमाईच...

पण आता कर कटेवर नसून

पुस्तकांनी ओतप्रोत भरलेले!


तू बनली आहेस,

सार्थपणे

ज्ञान, कर्म, सेवा, शिक्षण, 

रक्षण आणि समता 

प्रस्थापित करणाऱ्या

पदव्या आणि सन्मान 

प्रदान करणारं 

'यः क्रियावान् स पण्डितः'

किर्तीवंत विद्यापीठ!


   ■  शिवनाथ अशोक तक्ते  आ श्वी क र

*****

Tuesday, September 26, 2023

मखमली फुलांचे लाजणे



आतुरले हुरहुरले 

मखमली फुलांचे लाजणे

मोहरले बावरले

मोरपंखी चांदण्यांचे हासणे :: मखमली...

अन् उरात थरथरले

दरवळत्या श्वासांचे वाहणे :: मखमली...

 

केसामंदी तुझ्या गं 

चंद्र माळतो सखे

नजरेला भिडताना

विरघळतो मी सखे


बावरल्या हृदयातच गुंतले 

मखमली फुलांचे लाजणे

मोहरले बावरले

मोरपंखी चांदण्यांचे हासणे :: मखमली...


© शिवनाथ अशोक तक्ते आ श्वी क र

Sunday, December 11, 2022

चिरफाड


कवितेची माह्या | व्हावी चिरफाड 

ठेवता न भीड | अजिबात


विचार भिडता | थेट गाभाऱ्यात

दिवा कोपऱ्यात | पेटवावा


दिसलेले काही | टिपले वहीत

आपुलाले हित | वेचताना


अंधारात कोणी | पेटवावा दिवा

तमाला विसावा | आपसूक


निजताना रात | अंथरावी दिशा

काजव्याची आशा | सांकेतिक

Friday, December 9, 2022

आयुष्य


  आयुष्य  


जुन्या खोडांचं

नव्यांशी पटतंच असं नाही.

जुळवून घेताना 

अर्थाअर्थी खटके उडतातच.


नव्याचे नऊ दिवस,

अन् जुन्याचे सोनेरी दिवस.

नवं म्हणजे मोकळीक छान

जुनं म्हणजे पिंपळपान.


हे म्हणजे 

अगदी टिमकी वाजवणेच!


काळ्याचे करडे अन् करड्याचे पिंगट होत होत

केविलवाणे बेरंग होतात.

अर्थात हे शतकानुशतके पुन्हा पुन्हा 

घडत राहते.

यात समजावणे वा चमकावणे आलेच.


अधिक विस्तारानं आणि खोलात जाऊन

हे पिच्छा पुरवणेच आहे.

●●●


© शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर

Monday, September 26, 2022

तुला बरे जमायचे...


गालात गोड हासणे 

तुला बरे जमायचे 

डोळ्यातली शराब हाय 

बेहोश धुंद व्हायचे


कळूनही कळेचना 

मामला मनातला

चाहूल येतसा उगा

तुझ्याकडे पहायचे


व्हठ हे नाही जणू 

गुलाबपंखुड्याच ह्या

जाहली ऐसी तऱ्हा

हा जीव झाला बावरा


केशी तुझ्याच गुंतला

अत्तर सुगंधी मोगरा

दाटले आभाळ काळे 

हे तुला सांगायचे


पाहिले जेव्हा मला 

देऊन मानेला वळण

राहून गेले बघ कसे 

चेहरा तुझा बघायचे


आणखीच अडकत चालली 

माझी तुझ्यात स्पंदने

कानात माझ्या वाजती

मनलाजरी तव पैंजणे


उन्हात खोंड मिरवता

का आम्ह्या जळायचे?

चोरून पाहतो तुला, 

तुला बरे कळायचे?


राहिल्या ह्यांच्या सह्या, 

ह्यांनी उठविल्या वावडया

त्यांनाच बांधा तोरणे

ज्यांचे अजून व्हायचे!

••••

शिवनाथ अशोक तक्ते 

Tuesday, August 9, 2022

गुरू रूप





 ••• गुरू रूप •••

तळ स्थिर, कळ स्थिर, उगम स्थिर 

आणि विसावाही स्थिर

स्थिरपणाची व्याख्याही स्थिर


नित्याचे अरण्यासक्त आवाज 

कोलाहलप्रिय नियम डावलून 

सुस्थिर तत्वांच्या तळाशी 

सांगोपांग ज्ञानमुद्रेत स्थिर


हे कुठल्या राशीचे? कुठल्या देशीचे?

की हे परिमाणशून्य?

यांच्या हातीही शून्य अन् विश्वाची

उत्पत्तीही शून्यातूनच...

म्हणजेच तळापासून...

निढळापासून...

प्रश्नांकित मळभापासून 

चैतन्याच्या ओथंबांचा

जलप्रपात... 

एकूण एक अनादी अनंत

आकार, चिन्ह, अस्तित्व-नास्तित्व

यांच्या अलिकडले आणि 

पलीकडलेही.


अरुपाचे अर्करूप

व्याकरण म्हणजेच गुरू रूप

बाकी सर्व 

अव्यक्त, अपूर्ण, असंचयी

लघु रूप! 

त्यातही

मग आपण कोण?

जर मान्य केलं तर 

नास्तित्वाच्या अस्तित्वाचे

पराग कण अथवा त्यांचेही 

अस्थिर अभास!

•••••

© शिवनाथ तक्ते