साऊ!
तुझ्या प्रत्येक कृतीयुक्त
पावलाबरोबरच
इथल्या कर्ममठ्ठ
सुधारणावाद्यांना मोहळ डसले
जागोजागी
म्हणून पावलो पावली
तुला नामोहरम करण्याचे
त्यांनी आचारले होते कुव्रत,
रचले होते कुभांड...
भीती!
भीती तर तुला मुळात माहीतच नव्हती
माहीत होती गरिमा
ज्ञानमंत्र फुंकण्याची
पिचलेल्या आणि लाथाडलेल्या
पददलित सर्वहारांच्या कानात
एव्हढंच नाही तर
बहिष्कृत आणि गिधाडी मानसिकतेच्या
बळी पडलेल्या कित्येक अग्रहारींच्याही!
कारण तुझ्या भाळी होतं रेखीव चंद्रकोर
सौभाग्य आणि पिढी दर पिढी दरम्यान
ख्वाडा घालणाऱ्या कुव्यवस्थेला 'आडवं'
पाडण्याचं सामर्थ्य!
'क्रांतीज्योती'
क्रांतीचं बाळकडू आणि ज्योतीचं वरदान
लाभलेली माय! तू तर आमची आदिमाय,
आमची आज्जी, पणजी
बहीण, मुलगी आणि इतरही
कित्येक कित्येक रुपात नित्यनूतन
भेटतेस!
यम-नियम न पाळणाऱ्या
पत्थरांशी
झुंज देणारे तुम्ही दोघे बी
साक्षात
विठ्ठल-रखुमाईच...
पण आता कर कटेवर नसून
पुस्तकांनी ओतप्रोत भरलेले!
तू बनली आहेस,
सार्थपणे
ज्ञान, कर्म, सेवा, शिक्षण,
रक्षण आणि समता
प्रस्थापित करणाऱ्या
पदव्या आणि सन्मान
प्रदान करणारं
'यः क्रियावान् स पण्डितः'
किर्तीवंत विद्यापीठ!
■ शिवनाथ अशोक तक्ते आ श्वी क र
*****
No comments:
Post a Comment