Sunday, December 11, 2022

चिरफाड


कवितेची माह्या | व्हावी चिरफाड 

ठेवता न भीड | अजिबात


विचार भिडता | थेट गाभाऱ्यात

दिवा कोपऱ्यात | पेटवावा


दिसलेले काही | टिपले वहीत

आपुलाले हित | वेचताना


अंधारात कोणी | पेटवावा दिवा

तमाला विसावा | आपसूक


निजताना रात | अंथरावी दिशा

काजव्याची आशा | सांकेतिक

Friday, December 9, 2022

आयुष्य


  आयुष्य  


जुन्या खोडांचं

नव्यांशी पटतंच असं नाही.

जुळवून घेताना 

अर्थाअर्थी खटके उडतातच.


नव्याचे नऊ दिवस,

अन् जुन्याचे सोनेरी दिवस.

नवं म्हणजे मोकळीक छान

जुनं म्हणजे पिंपळपान.


हे म्हणजे 

अगदी टिमकी वाजवणेच!


काळ्याचे करडे अन् करड्याचे पिंगट होत होत

केविलवाणे बेरंग होतात.

अर्थात हे शतकानुशतके पुन्हा पुन्हा 

घडत राहते.

यात समजावणे वा चमकावणे आलेच.


अधिक विस्तारानं आणि खोलात जाऊन

हे पिच्छा पुरवणेच आहे.

●●●


© शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर