Sunday, January 20, 2019

अवघं जग ही एक रंगभूमी (अनुवाद)

शिवनाथ अशोक तक्ते
एम ए, एम फिल, सेट (इंग्रजी) एम एड.
९५९५६८७७६४
eshivprabhat@gmail.com
All the World's a Stage! ( ह्या स्वगताचा मी केलेला स्वैर भावानुवाद)
Speech: “All the world’s a stage”
By William Shakespeare
(from As You Like It, spoken by Jaques)
अवघं जग ही एक रंगभूमीच तर आहे!
 अवघं जग ही एक रंगभूमीच तर आहे,
आणि सर्व बाया-बापडे आहेत निव्वळ कलाकार!
त्यांना आहे त्यांच्या जाण्याचं अन येण्याचं निमित्त;
माणूस साकारतो वेगवेगळी पात्रं त्याच्या जीवन काळात,
त्याचं जगणं बांधलेलं असतं सात अंकांमध्ये.
पहिला अंक सुरू होतो
नवजात तान्हुल्याच्या आगमनानं,
अंगठा चोखत अन ओकाऱ्या काढत
असतं निरागसपणे
ते परिचारिकेच्या हाती;
आणि मग सुरू होतो दुसरा अंक- ज्यामध्ये
सकाळच्या ओजस्वी अविर्भाने,
तो असतो पाटी-दप्तर घेऊन
निरुत्साही मुद्रेने
अन काहीशा अनिच्छेनेच
तो जाताना दिसतो शाळेला
हळू... हळू....गोगलगायीच्या वेगानं.

त्यानंतर तिसऱ्या अंकामध्ये
अविष्कृत होतो पेटलेल्या उर्जस्वल श्वासांचा नायक-प्रियकर,
जो करत असतो प्रेयसीच्या सुरेख बाणाकृती भुवयांचं
तोंड भरून कौतुक स्वतः रचलेल्या कवितांतून;
आणि मग सुरू होतो चौथा अंक! रंगमंचावर
उभा ठाकतो झुंजार गडी! ज्यानं राखली आहे सिंहरूपी आयाळ
आणि घेतल्या आहेतअजब शपथा,
ज्याच्या रोमारोमात
झळकतो कोणालाही हेवा वाटावा असा रग्गेलपणा,
हुज्जत घालायला तो असतो सदैव तत्पर,
ज्याच्या शरीरभर जाणवतं सळसळतं चापल्य,
आणि हजारो शूरवीर सरदारांमध्येही
उठून दिसतं त्याचं आभाळाशी झुंज घेण्याचं
शौर्य अगदी ठळकपणे!
पाचव्या अंकात समोर येतो
गोलमटोल देहयष्टी आणि
 दिमाखदार रूबाब असलेला
सद्सद्विवेकी मध्यमवयीन माणूस,
ज्याचा नजरेत जाणवते तीक्ष्ण जरब
आणि ज्याची दाढी आहे
पद्धतशीर फॉर्मल कटमध्ये,
त्याच्या बोलण्यातून झळकतं
हजरजबाबी शहाणपण, अस्सल म्हणी
अद्ययावत संदर्भ आणि चपखल उदाहरणं;
आणि म्हणूनच त्याच्या भूमिकेतून
व्यक्त होतो प्रभावी उठावदारपणा.
अंक सहावा. वाढत्या वयाबरोबरच
त्याच्यामध्ये दिसू लागतात
अनिवार्य बदल
अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह,
त्याचं बलदंड शरीर झुकू लागतं
पुन्हा मावळतीकडं, न्यूनतेकडं,
सैल, ढगाळ पायजम्यात हलताना
दिसू लागतात त्याच्या
पायांच्या वाळलेल्या खुंट्या,
नाकावर स्थिरावलेला चष्मा, अन
ह्या वयात हमखास बाळगायच्या वस्तूंमुळं
अवास्तव लोंबलेले खिसे,
त्याची ठेवणीतली घट्ट अस्सल विजार
आता त्याला अगदी सैल, ढिली होतेय,
एकेकाळचा त्याचा पहाडी बुलंद आवाज
आता झालाय पोरगळलेला,
आणि बोलताना त्याला लागते
भयानक धाप,
कधी कधी लागतो त्याचा
स्वरपेटीत नसलेलाच स्वर,
आणि वाजते अनवट शीळ
त्याच्या तोंडून ह्या असह्य वयात.
अंक शेवटचा. सातवा अंक. वार्धक्य आणि वयहीन वेलीवर
कोमेजणाऱ्या आयुष्यफुलाच्या अनभिज्ञ
इतिहासाचा अगतिक प्रसंग शेवट.
शेवट, आगंतुक शेवट.
हेच ते अद्वितीय बालपण
तर नसावं ना?
की दुसरं बालपण? हो नक्कीच दुसरं बालपण!
पण निव्वळ अभाव! मूर्तिमंत अभाव!
दातांचा अभाव, दृष्टीचा अभाव,
अभाव चवीचा,
अन सगळ्याचाच विवेकी अभाव!
© शिवनाथ अशोक तक्ते
९५९५६८७७६४
★★★★★★★

थोडेसे बी एड बद्दल...

थोडंसं बी एड बद्दल !
तसं पाहिलं तर मी खूपच निराळा आणि आत्मनिष्ठ जीव. देखलेपणा पासून चांगलं चार-साडेचार हात दूर. हा विशिष्ट (शिष्ट?) पणा माझ्यामधे फार आधीपासूनच. तर मग मनात एक विचार आला की B Ed (शै. वर्ष २००८-०९) बद्दल थोडंसं व्यक्त व्हावं. म्हणजे सगळे जागे होतील. अगदी खडबडून. आमल्या, एच झेड, नितीन, राजू, आशू, निमाराय, रूपा, हिना, ज्योती, रमेश, उत्तम, काका वगैरे वगैरे. कारण सर्वजण त्यांच्या त्यांच्या समृद्धतेत मशगुल आहेत बऱ्यापैकी. तशीच माझी गत! पण हो आपलं बी एड होतंच मुळी इंटरेस्टिंग! आठवणी. सुखद, दुःखद, अजब, संस्मरणीय, प्रवाही, लॉर्ड, धक्कादायक आणि जाम विनोदी. दीदी (शीतल रणधीर) खूप करामती पोरगी (म्हणजे मॅडम!). नकलाकार, विनोदी पण हुशार! त्यामुळे दीदी आठवते अगदी हुबेहूब. मग मी काय म्हणतो? आपल्या आठवणी ताज्या करूयात का? कविता वाकचौरे यांच्या घरी जायचे राहूनच गेले! (H Z आठवतंय का काही?)
डॉ. एन पी पाटील सरांना कोण विसरेल? मला तर त्यांचं कानडी वळणाचं मराठी खूप आवडायचं. तसेच तरुण तडफदार नितीनकुमार माळी सर. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. "शिक्षक हा तमासगीर असतो" इति- नितीनकुमार. संबंध बी एड च्या कालावधीत मला न सुटलेलं कोडं म्हणजे अमोल रावते-आमल्या. त्याचा ठाव लागलाच नाही.
ना हस्ती है कुछ ना अदम हैं गालिब
क्या हैं तू ए नही हैं ।।
रविदास साळुंके (सा डुंके!) अत्यंत साधा, निखळ माणूस. पराकोटीचा आशावादी. Hz इतका कुणालाच कळला नसेल तो. पाच सप्टेंबर चं कळलं. अगदी सुन्न सुन्न झालं! शब्द हरवले. तोल ढळला! आणि खूप काही गमावलं. Hz, साळुंके व पी एन (पाटील) यांच्या रूमवर मी जायचो कधी कधी. साळुंके चं आदरातिथ्य लाजवाब होतं! धुळ्यावरून सप्तश्रृंगी माता गड (वणी) पर्यंत पायी चालत गेला होता. रूमवर वारंवार होणाऱ्या नॉन व्हेज पार्ट्या. पण हे सगळं कुठं तरी लांब विस्मृतीत गेलं होतं. संदीप वाकचौरे सरांचे वाचन, समज आणि विवेक सर्व काही अद्वितीय. तर हे सर्व कुवतीनुसार आणि सवडीप्रमाणे आपल्या साठी लिहिणार आहे. तळ ढवळण्याची सुरुवात तर झाली. पुढे भेटूच!
शिवनाथ अशोक तक्ते
९५९५६८७७६४
eshivprabhat@gmail.com

बा बसवा (कविता)

बा बसवा!
सांप्रदायिकतेच्या पल्याड विस्तीर्ण
मानव वस्त्यांच्या जंगलात धर्मचिकित्सेचे असंख्य
वणवे पेटवलेत तुम्ही.
मार्क्स आणि तुमच्यातला हाच तो धागा -चिकित्सेचा!
पण आपण दिलेल्या समतामूलक
मानवतावादी तत्त्वांचं पुढं
काय झालं? हे पाहायला तुम्ही नाहीत.
तशीही आपल्याकडं पंथांचा सुकाळू होताच.
त्यात आणखी एक भर म्हणून बसवतत्त्व!
वारकरी विट्ठलत्त्व, पंचशील बुद्धत्त्व, ग्रंथसाहेब,
अवैदिक जैनत्त्व,
सर्वार्थाने शिवाचा, मांगल्याचा
वाजवी आधार घेतलेला!
स्त्रीलाही मानवत्त्व मिळवून
देणारं विवेकी तत्त्व!
तसाच मानवी स्पर्श, संवेदना आणि असीम
मितीय शरणत्त्व! मानवत्त्व!
तुकोबा,रयतेचा राजा शिवबा, चोखोबा, जोतिबा आणि बाबा!
अनुभवमंटप ते संविधान व्हाया लोकशाही!
रक्तकल्याण(बसवकल्याण) ते महाड पर्यंतचा हा संघर्ष
मानवाचा, मानवाकडून, मानवतेसाठी!
-शिवनाथ अशोक तक्ते
९५९५६८७७६४
eshivprabhat@gmail.com

काहीतरी कर मित्रा! (कविता)

काहीतरी कर....मित्रा!
तू कुठवर असं वागवणार आहे
हे निराधार, बिनबुडाचं दुखणं?
कधी कधी तर्ररी देत चल त्यालाही.
हे अर्थहीन फुगणं, जीवाचा कोळसा करून घेणं अन
सतत शून्यातल्या तुझ्या अस्वस्थतेला
आतुरतेनं अतार्किक (कथार्टीक) भाग देणं!
आता तरी विसर, तुही कधी होतास तंतोतंत माणूस,
चार-चार महिने करायचास काथ्याकूट
तुझ्या अमुक तमुक परीक्षांसाठी!
बेचैन व्हायचास, मलूल व्हायचास
हमखास प्रत्येक निकालानंतर!
तुझं हे अवकाळी दुखणं आजकाल खूपच बळावलंय,
करपून चाललास तू प्रदीर्घ मृगजळी सावलीत!
हसू करतोयस तू
तुझ्या, माझ्या आणि सोज्वळ दिशांच्या
विश्वभानाचं!
© शिवनाथ तक्ते

जाणिवा


खऱ्या खुऱ्या जाणिवांच्या कोटी प्रक्रियांमध्ये स्वतःचा मुळमुळणाऱ्या असंख्य गुळमाट संवादांचा अर्थ शोधता येईल का ? बेट्यांनो नीट समजून घ्या. पुन्हा अडचण नको. कशाला उगाच हा थाट माट आणि वाट. काय हे? उगाचच. नाहीतर काय? सूड नेमका कोणावर उगवायचा हे कळायला वाट नाही. थोरामोठ्यांच्या खोट्या अस्मिता कुरवाळत बसतो आपण अन हाती काय राहते? कोणीच धुरीण ह्या आकलनाच्या प्रक्रियेत सहाय्य ठरू शकत नाही. म्हणजे या अर्थी बरंच काही बिनसलंय आपलं आतून.
आपण कुठून आणणार अहोत वाळलेल्या शेंगा आणि भिजलेल्या मंजिऱ्या? त्यापेक्षा एखादी गोष्ट सांगून मोकळं व्हावं एकदाचं! पण तसंही करता येत नाही एकाएकी. आहेत. सांगण्याजोग्या एक दोन गोष्टी आहेत माझ्या जवळ. पण वैतागलेल्या मनस्थिती वर काहीतरी रामबाण इलाज शोधावा लागेल. चार एक मोक्याच्या जागा हुडकाव्या लागतील.

विस्मरणाच्या वाटेवर ...

विस्मरणाच्या वाटेवरील आठवणी..!
घर भरून उरतील असे भिन्नान्वयी अनुभव. बाप आहे. बापाची आईही आहे. पण बापाचा ल्योक अन आजीचा नातू? कुठं आहे त्याचा शोध घेत असतील दोघेही. पोरानं बापाचा आधार व्हावं. नातवानं आजीची सेवा करावी आणि कधी काळी रात्र रात्र जागून पाय चेपून दिले असतील त्याची केविलवाणी परतफेड करावी. आजीच्या मायेला माईच्या हळूवारतेची सर. आईचं पात्र उभ्या जन्मभर पेललेलं तिनं. अजूनही ती शेतात राबताना दिसते. अंगांगभर नुसत्या वेदनाच आहेत त्याव्यतिरिक्त काय संचित आलंय तिच्या नशिबी. शेवटी पहारेकरी शेतमजुराचीच लेक ती. चंदनाच्या देहाला कष्टाचाच सुवास येणार. आजीचं कैवार घ्यायला नातवाला वेळ कुठाय? त्याला तर तास घ्यायचे असतात. स्वच्छंदी जगता येणार नाही ना. त्याच्यातला कलाकार मरेल ना झटदिशी. किंवा त्याची अकॅडेमिक ग्रोथ का काय ती थांबेल! खोट्या आशेवर अजूनही ती बसलेली असेल. तिचा स्वभाव कुचका असल्याचं कळतं एक दोन कळत्या सुवशीणींकडून. अधिक मुरल्यावर लोणचं असंच लागणार ना!
बापाचं काळीज सुपाएव्हढं! हल्ली सुपाची कदर आहे तरी कुणाला ? पण तोही कमालीचा जादूगार. ढोरवानी काम ओढायचा. रात्रीतून अचानक इमले बांधायचा. रापायचं आणि खपायचं त्यानं जणू मनाशीच बांधलं होतं. लेकाची स्वप्न स्वतःच्या डोळ्यांत पाणी आणून आणून भिजवायचा. पण कधी माघार नाही. पण लेकाच्या मनातलं त्याला कसं कळलं नाही? कसा झुरत चाललाय तो एकाएकी वाळणाऱ्या झाडपरिस. शेवटी बापालाही बेगडी दुनियेची, नाटकी स्वभावाच्या पात्रांची चटक लावलीच लेकानी. अन आता तीच ती करमणूक भिनत जाते बापाच्या नसानसांतून...!

उंची

उंची
एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर काय-काय कल्पना कराव्या लागतात. ह्या नुसत्या कल्पनेनंच हुरळून जायला होतं. उंची आठविण्यापेक्षा खोली आठवण्याचाच प्रयत्न होतो. पाण्याचं प्रतिबिंब पाहताना पाण्यात डोकावून पाहण्याची आवश्यकता नसते तर (स्व) अंतरंगात डोकावण्याची असते. कल्पनेला किंमत असते. पण केव्हा? जेव्हा कल्पना तितकीच जीवंत असते तेव्हाच. ‘त्या’ (विशिष्ट) उंचीवरून सर्वांची मतं स्वीकारता येत नसतात अन लाथाडताहि येत नाहीत. उंचीचा उगम हा मनातूनच व्हावयाचा असतो. अन्यथा तिचं (उंचीचं) मूळ आणि कूळ विचारण्याचा विफल प्रयत्न केला जातो.
उंची म्हणजे श्रीमंती, श्रीमंती म्हणजे उंची नव्हे. पण हे नक्की! उंची म्हणजे कर्तृत्व आणि कर्तृत्व म्हणजे उंची. आदरभाव आणि स्वभाव ह्या (एका) नाण्याच्या दोन बाजू होताना चांगलंच वाटतं. पण वास्तविकतेत ती दोन स्वतंत्र नाणीच होऊन जातात. निचभाव मनात ण येणे, तुच्छतेचे काळे-कभिन्न ढग मनाला कधीच न शिवावे हाच खरा (खऱ्या) उंचीचा अर्थ आणि सर्वार्थ असावा. अपेक्षांपेक्षा उत्कर्षाची सलामी आणि नाबाद यश, त्यासाठी काठोकाठ (आटोकाट) प्रयत्न करावेत आणि यथार्थ वाचन (reading) जाणून घेण्यासाठी मनाचा दगड (माझ्या मना बन दगड ..!) करून अंतरंगात सोडवा (पाण्यात नाही!). जे ‘निदान’ व्हायचं ते होईल. भार जास्त की बल जास्त? याचाही (निदान) विचार होईल. अंतरीचा शामल दोर जर पिळवटला जात असेल व त्याची जाण आपणांस होत असेल तर ‘प्रयोग’ तिथंच थांबवावा. अन्यथा मोतीकण समजलं जाणारं ज्ञान हे केवळ पाण्याचा बुडबुडा ठरेल! प्लावक आणि आर्किमिडीज फक्त शब्दप्रामाण्य नसेल (तसं ते नसावं ही!) तर ते विचारशील आणि सत्याच्या म्हणजेच ‘त्या’च्या (ईश्वराच्या) जवळ नेणारं जगतेपणीचं दृश्य (स्वप्न) ठरेल. ‘विन्ची’कडे गहनतेची उंची होती, ‘चिंविं’कडे हस्योपचाराची उंची होती. ‘विंदां’कडे तत्त्वप्रचुर काव्याची उंची होती. तर बाबांकडे ‘साधनेची’ आणि कार्याची उंची होती. त्यामुळे फक्त पायाजवळ पाहण्याची वृत्ती (आणि आवृत्तीही!) न ठेवता, भुवयांचे उंचावटे (आश्चर्यानं!) सुस्पष्टपणे अन रेखीवपणे टिपता येतील अशी प्रेरणादायी सुरुवात (सलामी) आणि धनात्मक तपदील व्हावा एवढीच उंची (अपेक्षा नव्हे!) ठेवावी.
२८/०१/२०११
शेवगाव

मी स्वागत करतो ...(कविता)

मी स्वागत करतो
उत्सवा निमित्त आलेल्या अस्वस्थतेचं...
गोळाबेरजेचे नेहमीचे अंदाज सोबत असल्याच्या
शाश्वततेचंही... मी स्वागत करतो
छोटया दोस्तांसाठी लिहून ठेवलेल्या गोष्टींबद्दल
त्या कवींचं... मी कौतुक करतो
जोडण्यासारखे बरेच अनुभव असतात
पण त्यासाठी धागा शोधत जाण्याच्या
तल्लीनतेला मी शरण जातो
लिहिता हात आणि विचारशील डोकं
यांना मी वंदन करतो
वेदनांचं स्मरण ठेवणाऱ्या स्मृतिस्थळांना
मी सलाम करतो
(C)शिवनाथ तक्ते
९५९५६८७७६४

डेरेदार वृक्षांच्या सावलीतून (कविता)

डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना...
काळजाला टोचणाऱ्या सुचिपर्णी सुया
गिरवतील त्यांच्या कपाळी लिहिलेलं
टोकदार भवितव्य...केवळ हिशोबी तरतूद वगैरे ठीक पण,
झाड वाट्टेल तेव्हा जबाण्या द्यायला तयार होईल?
भूतकाळाच्या तळाशी गळ टाकून बसलेला तू
आतातरी पराभूत उद्यानांचा सूड उगवायची शपथ
देशील का तुझ्या तीक्ष्ण अंदाजांना?
वाती जाळत अंधाराची वाट पाहत
बसलेले तुझे मलूल पाय,
केवळ गडद शाईतील फसवे इंद्रिय
बधिर होण्याची शक्यता घोळवत
राहतील...
शक्यतो बेचव तपासकार्य चालूच ठेव
तुझ्यासाठी राखून ठेवलेला काथ्याकूट राहील तसाच
अन
बाकी जेमतेम विचकट हावभाव विरघळू देत
कणखर सालीच्या एकसुरी वृक्षांनी आक्रमिलेल्या सावलीत...
तू मात्र पुढे हो तसाच...
नकोसच संकोच करु त्या सावली भोवती
फेर धरण्याचा,
कारण व्याकरणाचे स्पष्ट नियम
तुलाही लागू होतील
सावलीतून बाहेर पडण्याचं धारिष्ट्य तर ठेव!

कविता

शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
काय फरक पडतो तुझ्या जाण्यानं?
काय फरक पडतो तुझ्या जाण्यानं?
खूप फरक पडतो,
माझ्या येण्याचं, स्थिरावण्याचं अन समावण्याचं
तूच तर बघितलंस!
अजूनही तेथेच रुतून बसलेला असतो
माझ्याच दुरावस्थेच्या शिक्षणक्षेत्री...
तू पाहिलंस मला अगदी तेव्हाच,
जेव्हा होती मला नितांत गरज नकारात्म कोषातून,
उचलंस तसंच, अन बसवलंस तू मला
जिथं मला मिळू शकला असता मोकळा श्वास, मोकळं आकाश आणि
स्वप्नांनी खच्च भरलेला भवताल...
काय फरक पडतो तुझ्या जाण्यानं?
खूप फरक पडतो,
अधोरेखित झालोच नसतो, नसतोच राहिलो उभा
मी माझ्या पायांवर दोन्ही,
अगदी बोट पकडून चालतं केलंस मला,
आणि दाखविल्यात खाच खळगा,
तू स्वतः त्यात उतरून...
सावरलंस मला जीवनाच्या प्रत्येक थांब्यावर,
स्वतः ही सावरतोच आहे,
पडक्या भीती बांधून, चिखल-गाळ काढून
पण शेवटी तूही एक माणूसच!
हुबेहूब माणूस, जो असायचा सतत भूमिकेत
दुसऱ्यांना सुखावण्याच्या,
कधी वेळ प्रसंगी खोटं बोलून,
कधी फेक कॉल,
तर कधी वेळ मारून...
काय फरक पडतो तुझ्या जाण्यानं?
खूप फरक पडतो,
मी तुझ्या प्लॅनिंग नुसार बहरलो, फुललो, फळलो
पण नेमका विसरलो जवाहिऱ्याला
नेमक्या त्या क्षणी जेव्हा पडत होता
पाऊस रानभर आणि कोसळत होता तुही
आतून फाटून तुटून गेलेल्या
पतंगासारखा ...
वडीलकीच्या तळमळीनं ज्या हातांनी सावरलं
मला, ते हात मात्र रिकामेच राहिलेत अनामिक प्रतीक्षेत...
अजूनही सतत असतोस अवती भोवती,
माझ्या तळघरात, लपवून ठेवतो मीही
त्या आठवणी... खोटं बोलण्याच्या, सायकल मारत
सिनेमे पाहायला जाण्याच्या, आणि अजूनही तू मला खरं खरं ओळखण्याच्या,
मी खोटं खोटं समजावण्याच्या,
चेहऱ्यावर हसू टिकवण्याचा आठवणी,
शेवटी तुही एक माणूसच!
हाडा मांसाचा, त्रासाचा आणि
पाठीवर हात ठेवण्याच्या प्रयासाचा!
अन स्वतः साठी सावध राहण्याच्या काळात,
जाणून बुजून राहिलास बेसावध,
जणू तुला माहितच होतं,
तुझं अनिर्णित भवितव्य...
काय फरक पडतो तुझ्या जाण्यानं?
(C) शिवनाथ अशोक तक्ते

कवित्व !

कवित्व हे कोशातील दोषांचे देखणे अस्तित्त्व शोधण्याचे परिमाण आहे. सौंदर्य आणि देहबोली यांच्या दरम्यान जन्माला येते ती सहवेदना. विश्वास ठेवायला तसूभरही जागा पुरेशी. परंतू जागोजागी अविश्वासी समित्यांचे पुनरुत्थान होत आहे. सुखाच्या खातर सारखी टोचणी सहन करतो आपण. आपल्या अस्तित्वाचे संवेदन बेचव आणि तापदायक आहे का? कोशातील माणसे जोशात येऊन मानगुटीवर बसणाऱ्या करुणांचे शोष सादर करतील ? बेढब आस्वादकतेचा निचरा होण्यास सुरुवात झाल्याची हीच ती नीच वेळ. पेलवत नसलेले असंख्य संदर्भ तळाला साचलेल्या गाळात अगदी गालातल्या गालात हसल्यागत फसले आहेत. निवृत्तीचा पेहराव हा विधिवत करावयाच्या अस्मादिक कृतींचा बाह्यनुवर्ती आवेग आहे.

I Killed My Father (Poem)


I killed...My father!

I killed my father on every occasion
of pain and dissolution;
He was killed with every sigh and nodding.
I killed him several times
with words of impoliteness.
I excavated him on every possible grounds by inches
He was found dead for many a time before his exit,
He has become a passing reference at the bed.
He is with tremendous desires and unending urges
He is with a sound of darkness that cannot be illumined...
I deserve all the credit of
playing on the game of abusing for unidentified deliverance.
I simply killed him to suffice his unrest...!
(C) Shivnath A. Takte

खोदाखोद

खोदाखोद
बऱ्याच वर्षां नंतर असा अवसर मिळाल्यास क्या बात है! आपण कधी स्वतः शी बोलतच नाही. मग राहून राहून आपण हे खोदून खोदून विचारायला लागतो. जो भेटेल त्याला. जो उपलब्ध होईल. पण बघा असे इतरांसारखे रेघोटेवीर होण्यात काय हाशील ये? एक तर असं एकटं भेटायचं म्हंजे एकूणच भारी पंचाईत. आमच्याकडे आसं कायहे याचा शोध घेता येतो याचा जाम आनंद हे. डोळे भरल्या बिगर आसं खळखळून हसायला काय मजा नै. लहानपनी आम्या लयी येडे उद्योग केलेल्ये भौ. शेवग्याच्या झाडाला 'शेंबूड' यायचा आणि आमी त्याची भाजी बनवायचो. चिखलाच्या भाक्री कालोन बनवायचो. पण एक आहे, तसं जगनं खरंच दुर्मिळे. मला त चहा बरोबर रताळी खायला आवडायची. माझा आतेभाऊ जाम येडे प्रश्न इचारायचा. पाटाला जर लयी पानी आलं तर पंचतराम(गरम पंचायत) काय करील? तो.

मी

मी
मी महेशच्या आदेशाचं पालन करत होतो. पृथ्वीवरील पहिल्या पावलाचा माग काढत चाललो. रीती कोशागरे पुनः पूर्ववत होईतोवर असंच फिरावं लागेल. काळोखात अगदी सहज आनंदाकडे पाठ फिरवता येते. खंडोबाच्या खेळाचा पहिलाच दिवस होता. सगळ्याच बाबतीत 'कोवळी' असणे चांगलेच असते. कोवळी उन्हे, कोवळी सल, कोवळी जाणीव. कोवळा विश्वासघातही फायदेशीरच. बावळटछाप सुद्धा कोवळी असल्यास बेहत्तर!