Tuesday, October 22, 2019

इये हृदयीं चे तें हृदयीं


इये हृदयीं चे तें हृदयीं:
वनस्पती-वाङ्मयाचा 'प्रगमॅटिक' प्रवास




त्रिमितीय जीवनप्रवासातील एक महत्त्वाचं आयाम म्हणजे -गोरखनाथ जाधव. दुसरं आयाम अर्थातच नामदेवराव पवार. (इथं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करता येणार नाही. कारण'  त्या' ज्या त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ बेटर हाफ वगैरे! इथं बायकांचा विषय बाजूला ठेवला आहे कारण तो स्वतंत्र लिखाणाचा विषय होऊ शकेल!) आज त्यांच्या (त्याच्या) वाढदिवसाच्या निमित्तानं काही अज्ञात कंगोरे उजळ होत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. माझ्या(म्हणजे माझ्या बायकोच्या!) ड्रीम निओ गाडीवरील एक सदैव राखीव असलेलं सीट. आमच्यातलं बरंच काही(सर्व काही!) एकमेकांना पूरेपूर माहित. घरचे संबंधही अगदी घरच्या सारखे. कमीपणा, साधेपणा आणि मोकळेपणा यांचा मिलाफ म्हणजे गोरखनाथ जाधव(सर). समज ही उपजतंच! घरी (लासलगाव-वाकी) वारकरी-नाथपूजक कुटुंबाचा प्रदीर्घ वारसा. शेती, म्हशी, दूध, डोंगरएव्हढं काम, कांदे(किंग) त्याबरोबरच सुबत्ता आणि समृद्ध अडगळही! शेतीचा गाडा ओढणारा मोठा भाऊ(योगेशदादा) आणि वहिनी. अण्णा आणि ताई. तसेच अप्पा आणि मावशी. कृषीपूरक आदर्श वातावरण लाभलेला माणूस म्हणजे गोरखनाथ. मागच्याच वर्षी अशक्यप्राय अशी गोरखनाथगड वांबोरी-वृद्धेश्वर- मायम्बा- कानिफनाथ मोहीम यशस्वी झाली. (तसं अशक्य काही नाही परंतू बायकांना गुंगारा देऊन एकटं-एकटं (जाधव, राशीनकर आणि तक्ते तिघे तिघे एकत्र फिरलो तरी एकटं एकटं फिरतात, असा टोपारा येतोच! असो)
आपण कोठून तरी कोठे तरी जाण्यासाठीच एकत्र येत असतो. येण्याअगोदर जाणं फिक्स असतंच. आणि तेच कितीही नाही म्हटलं तरी जास्तच अस्वस्थ करणारं असतं. तरंगे वस्ती वरील (२०१४-१५) एन एस एस शिबीरात ओळख झाली. त्या नंतर घसरट वाढतंच गेली. मग सहकारी झालो. मग वार्षिक स्नेहसंमेलनात  सह-निवेदक झालो. त्यांनतर अधून मधून शिबिरात एखाद दुसरा डान्स परफॉर्मन्स! गाडीवर हरहुन्नरी मोहिमा चालूच! भंडारदरा, कळसूबाई, साम्रद, रतनगड, नगर, नाशिक, श्रीगोंदा, जामनेर, औरंगाबाद, पुणे(खडकी) जुन्नर, पारनेर, निघोज, शिरूर, आणि उरलं सुरलं बाळेश्वर वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांना नेहमीच धाक वाटायचा. पण तेवढाच आदरही! माणूस म्हणूनही खूपच सामाजिक! शिक्षक कर्मचारी पैकी कोणाचंही अडलेलं घोडं कार्यस्थळी पोहचविण्याची शंभ टक्के हमी. रात्री अपरात्री दवाखाने, मदत, धावपळ यासाठी हक्काचा माणूस. (आपला माणूस आपल्यासाठी! त्याची भरपूर व्याजासह किंमतही मोजावी लागली आहे!) पण अडल्या नडल्या वेळी हमखास उभा राहून सावरणारा हाच आपला माणूस. बहि:शाल, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक, कार्यशाळा, विशेष कार्यक्रम, मतदार जागृती कॉलेज डॉक्युमेंटरी वगैरे वगैरे.
अभय(आबा) डगळे(चिंचवणे) हा त्याचा यार. तो अडचणीत असताना त्याला कितीदा मदत करताना मी गोरखला पाहिलंय. तोच अभय भीतीनं गलबलून गेल्यावर मरणाच्या दारात असताना अस्वस्थ झालेला गोरख मी पाहिलाय. आता तर न बोलताही सर्व काही कळतं आम्हाला एकमेकांचं, एकमेकांबद्दल! माझी सामाजिक बुद्धीमत्ता वाढण्यात त्याचाच हात आहे. स्टोन, मूळव्याध आणि हायपर ऍसिडिटी सारख्या दुखण्यावर हसत हसत मात करणारा हा माणूस अवलियाच असू शकतो. आणि हेच आमच्यातील इये हृदयींचे ते हृदयीं पोचणारं वनस्पती-वाङ्मयीन प्रगमॅटीक अर्थवहन आहे.
©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
९५९४६८७७६४, eshivprabhat@gmail. com
आश्वी खुर्द, २२/१०/२०१९ १०.३४ रात्रौ

Monday, August 12, 2019

मैत्रीच्या नावानं... चांगभलं!

पुनर्भेटीचे संकेत ...
साल: २००९
ठिकाण: ज्ञानगंगा विद्यालय, मांची हिल
वर्ग: ५ वी अ आणि ब
अर्थात मी ५ ब चा वर्गशिक्षक होतो. काही मुलांची नावं उदाहरणार्थ पुढील प्रमाणे:
रुपेश मालपाणी, रसिका बोरा, साबळे, जोंधळे, वैष्णवी उंबरकर, वैभवी इत्यादी. तसेच हजारे आणि वगैरे वगैरे! काही नावं बरोबर तर काही चुकलेलीही असतील. पण आशय तोच. सोबतीला पंढरीनाथ बाचकर, चिंधे, हजारे, जोशी, ताजने, मैड आणि बरीच महनीय शिक्षक मंडळी. रवी जानराव सुद्धा तेथेच भेटला. तसं बघायला हा आठवणींचा भलामोठा विस्तृत पट. आणि हो मेहजबिन सय्यद मॅडम! त्यांना कोण विसरेल? एकूण एक सर्वच अंगे ओळखीची. ज्यूदो कराटे प्रशिक्षक बनगइय्या थेटपर्यंत! मधले बरेच विस्कळीत. कवितेची आवड तेथूनच बळावलेली. असो. तर कारण एव्हढंच की वर्ग ५ब मधील एक बारीक पोरगा. भित्रा आणि कमी बोलणारा. पण स्मरणात राहील असाच. पण त्यावेळी तो स्मरणात राहील इतकाही ठसठशीत नव्हता. पण का कोण जाणे. मीच त्याच्या स्मरणात राहिलो असेन! अंक संपला. थोडक्यात गुंडाळता घ्यावा लागला. पुणेकर (गोळे) बाईंचे व्याख्यान. हॉस्टेलर्स साठीची मेस. विद्यार्थी स्वागत समारंभ. संध्याकाळच्या अभासवेळी करमणुकीखातर मी गायलेले ''तेरी दिवानी" गाणं. घटक चाचणी परीक्षा. सगळं सगळं पळवावं लागेल पुढे. किती पुढे? तर थेट शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत!
साल: २०१७-१८
ठिकाण: फिरोदिया महाविद्यालय, साकुर
वर्ग: वर्गच वर्ग. त्यातही बरेच वर्ग-सिद्धांत. नवं व्याकरण. नवी गणिते. आणि बऱ्यापैकी बसलेला जम. (कारण जून-जुलै २०१२ पासून फिरोदियातच! एकदा तंबू-गबाळ उचललं होतं पण मग पुन्हा नीट सरकवून बसवलेली घडी!) असो. अव्वल, अस्सल, अतरंगी आणि अनपेक्षित घोळक्यात भेटावा जुना त्याच्या बालपणातला माझा विद्यार्थी. हो मिस्टर संकेत पवार. विशेष म्हणजे शक्यता असते पण जग खूप मोठं असतं ह्या कल्पनेला छेद! प्रथम वर्ष विज्ञान वर्गात हा (संकेत) प्रवेशित. त्यात मूर्ती लहान आणि अजबच! जिजाबापू नान्नर(बापू) त्याची हमखास मजा घेणार! गोरखनाथ जाधवला अत्यंत भिणारा! जाधवांची तशी ख्यातीच! पण हे अचाट प्रकरण. बरं माझा आणि संकेतचा तसा रितसर संपर्क येणे शक्य नव्हते. कारण मी कला शाखेचा (इंग्रजीचा) प्राध्यापक. (इयत्ता बारावी नंतर विज्ञान शाखेशी रीतसर फारकत घेतलेली. पण तोच स्वतः होऊन माझ्याकडे आला व जुनी (ज्ञानगंगा विद्यालय) ओळख सांगितली. एकतर विश्वास बसत नव्हता आणि तो पण नीटसा आठवत नव्हता. पण मग त्याची अस्सल देहबोली. (डोळेच जास्त संवादी!) मग खात्री पटली की हा तोच 'संकेत'! मध्यंतरी केव्हातरी (नक्की केव्हा? हे महत्वाचे नाही. आणि गरजेचे त्याहूनही नाही) 'अग्नेयम' स्पर्धेसाठी सी एस आर डी(नगर) च्या एम बी ए कॉलेजमध्ये पाठविले. त्यात संकेत आणि हौशाबापू डोलनर(आणखी एक विक्षिप्त प्रकार!) यांना मुख-चित्रण (face-painting) करिता पाठविले. पण हौशाबापूला 'तोंड' आवरता येत नाही असं (राशीनकर आणि जाधव यांच्याकडून) कळलं! असो. नंतर असाच वार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रसंग! (अतिशय डोकेलिटी वापरून आकारास आणलेल्या) स्टेजवर तितक्याच बेभान अविर्भावात नाचणारा 'मयूर ताजने'. (तशी त्याने स्त्री-वेशात सादर केलेली लावणी बेष्टच. पण ते वेगळं प्रकरण! त्याबद्दल पुन्हा कधी. किंवा कधीही नाही!) बघता-बघता प्रेक्षकांमध्ये (अगदी उत्स्फूर्तपणे!) नाचणारा 'संकेत'चा डान्सर-संकेत जागृत झाला. तर म्हंटलं असा देखणा अविष्कार स्टेज वर दाखवावा! आणि बघता-बघता संकेत ने मयुर चा पत्ता कट केला. (मयुरचं भवितव्य अंधारात!) आणि आणखी बऱ्याच काही गमती-जमती. त्यानंतर दुसऱ्या वर्षाला संकेत कॉलेजच्या संकेतस्थळावर दिसेनासा झाला. नेमका कोठे प्रवेशित झाला कळलेच नाही! मध्यंतरी दाढ-आश्वी रोडला दाढच्या थोडं अलीकडे एका नर्सिंग पदविका अभ्यासक्रम जाहिरातीच्या फ्लेक्सवर मिस्टर संकेत पवार याचा फोटो!
तर मग ह्या अपेक्षित-अनपेक्षित भेटींचे 'संकेत' काय समजायचे?
आणि मग एक प्रश्न स्वतः साठी:
तुझे गुज 'संकेत' मजला उमगले?
विश्वासाच्या घट्ट आणि मजबूत ओल्या काथ्याप्रमाणेच (हो. बांधकामात 'पहाड' बांधताना हमखास आणि भरवशाचा समजला जाणारा काथ्या!) कित्येक माझ्यासारखे आणि संकेत सारखे मैत्रीचे बंध भक्कमपणे जोडले गेले असतील!
©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
ठिकाण:श्रीरामपूर (११ ऑगस्ट, २०१९, वेळ ११.५७(रात्रौ.)


Sunday, January 20, 2019

अवघं जग ही एक रंगभूमी (अनुवाद)

शिवनाथ अशोक तक्ते
एम ए, एम फिल, सेट (इंग्रजी) एम एड.
९५९५६८७७६४
eshivprabhat@gmail.com
All the World's a Stage! ( ह्या स्वगताचा मी केलेला स्वैर भावानुवाद)
Speech: “All the world’s a stage”
By William Shakespeare
(from As You Like It, spoken by Jaques)
अवघं जग ही एक रंगभूमीच तर आहे!
 अवघं जग ही एक रंगभूमीच तर आहे,
आणि सर्व बाया-बापडे आहेत निव्वळ कलाकार!
त्यांना आहे त्यांच्या जाण्याचं अन येण्याचं निमित्त;
माणूस साकारतो वेगवेगळी पात्रं त्याच्या जीवन काळात,
त्याचं जगणं बांधलेलं असतं सात अंकांमध्ये.
पहिला अंक सुरू होतो
नवजात तान्हुल्याच्या आगमनानं,
अंगठा चोखत अन ओकाऱ्या काढत
असतं निरागसपणे
ते परिचारिकेच्या हाती;
आणि मग सुरू होतो दुसरा अंक- ज्यामध्ये
सकाळच्या ओजस्वी अविर्भाने,
तो असतो पाटी-दप्तर घेऊन
निरुत्साही मुद्रेने
अन काहीशा अनिच्छेनेच
तो जाताना दिसतो शाळेला
हळू... हळू....गोगलगायीच्या वेगानं.

त्यानंतर तिसऱ्या अंकामध्ये
अविष्कृत होतो पेटलेल्या उर्जस्वल श्वासांचा नायक-प्रियकर,
जो करत असतो प्रेयसीच्या सुरेख बाणाकृती भुवयांचं
तोंड भरून कौतुक स्वतः रचलेल्या कवितांतून;
आणि मग सुरू होतो चौथा अंक! रंगमंचावर
उभा ठाकतो झुंजार गडी! ज्यानं राखली आहे सिंहरूपी आयाळ
आणि घेतल्या आहेतअजब शपथा,
ज्याच्या रोमारोमात
झळकतो कोणालाही हेवा वाटावा असा रग्गेलपणा,
हुज्जत घालायला तो असतो सदैव तत्पर,
ज्याच्या शरीरभर जाणवतं सळसळतं चापल्य,
आणि हजारो शूरवीर सरदारांमध्येही
उठून दिसतं त्याचं आभाळाशी झुंज घेण्याचं
शौर्य अगदी ठळकपणे!
पाचव्या अंकात समोर येतो
गोलमटोल देहयष्टी आणि
 दिमाखदार रूबाब असलेला
सद्सद्विवेकी मध्यमवयीन माणूस,
ज्याचा नजरेत जाणवते तीक्ष्ण जरब
आणि ज्याची दाढी आहे
पद्धतशीर फॉर्मल कटमध्ये,
त्याच्या बोलण्यातून झळकतं
हजरजबाबी शहाणपण, अस्सल म्हणी
अद्ययावत संदर्भ आणि चपखल उदाहरणं;
आणि म्हणूनच त्याच्या भूमिकेतून
व्यक्त होतो प्रभावी उठावदारपणा.
अंक सहावा. वाढत्या वयाबरोबरच
त्याच्यामध्ये दिसू लागतात
अनिवार्य बदल
अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह,
त्याचं बलदंड शरीर झुकू लागतं
पुन्हा मावळतीकडं, न्यूनतेकडं,
सैल, ढगाळ पायजम्यात हलताना
दिसू लागतात त्याच्या
पायांच्या वाळलेल्या खुंट्या,
नाकावर स्थिरावलेला चष्मा, अन
ह्या वयात हमखास बाळगायच्या वस्तूंमुळं
अवास्तव लोंबलेले खिसे,
त्याची ठेवणीतली घट्ट अस्सल विजार
आता त्याला अगदी सैल, ढिली होतेय,
एकेकाळचा त्याचा पहाडी बुलंद आवाज
आता झालाय पोरगळलेला,
आणि बोलताना त्याला लागते
भयानक धाप,
कधी कधी लागतो त्याचा
स्वरपेटीत नसलेलाच स्वर,
आणि वाजते अनवट शीळ
त्याच्या तोंडून ह्या असह्य वयात.
अंक शेवटचा. सातवा अंक. वार्धक्य आणि वयहीन वेलीवर
कोमेजणाऱ्या आयुष्यफुलाच्या अनभिज्ञ
इतिहासाचा अगतिक प्रसंग शेवट.
शेवट, आगंतुक शेवट.
हेच ते अद्वितीय बालपण
तर नसावं ना?
की दुसरं बालपण? हो नक्कीच दुसरं बालपण!
पण निव्वळ अभाव! मूर्तिमंत अभाव!
दातांचा अभाव, दृष्टीचा अभाव,
अभाव चवीचा,
अन सगळ्याचाच विवेकी अभाव!
© शिवनाथ अशोक तक्ते
९५९५६८७७६४
★★★★★★★

थोडेसे बी एड बद्दल...

थोडंसं बी एड बद्दल !
तसं पाहिलं तर मी खूपच निराळा आणि आत्मनिष्ठ जीव. देखलेपणा पासून चांगलं चार-साडेचार हात दूर. हा विशिष्ट (शिष्ट?) पणा माझ्यामधे फार आधीपासूनच. तर मग मनात एक विचार आला की B Ed (शै. वर्ष २००८-०९) बद्दल थोडंसं व्यक्त व्हावं. म्हणजे सगळे जागे होतील. अगदी खडबडून. आमल्या, एच झेड, नितीन, राजू, आशू, निमाराय, रूपा, हिना, ज्योती, रमेश, उत्तम, काका वगैरे वगैरे. कारण सर्वजण त्यांच्या त्यांच्या समृद्धतेत मशगुल आहेत बऱ्यापैकी. तशीच माझी गत! पण हो आपलं बी एड होतंच मुळी इंटरेस्टिंग! आठवणी. सुखद, दुःखद, अजब, संस्मरणीय, प्रवाही, लॉर्ड, धक्कादायक आणि जाम विनोदी. दीदी (शीतल रणधीर) खूप करामती पोरगी (म्हणजे मॅडम!). नकलाकार, विनोदी पण हुशार! त्यामुळे दीदी आठवते अगदी हुबेहूब. मग मी काय म्हणतो? आपल्या आठवणी ताज्या करूयात का? कविता वाकचौरे यांच्या घरी जायचे राहूनच गेले! (H Z आठवतंय का काही?)
डॉ. एन पी पाटील सरांना कोण विसरेल? मला तर त्यांचं कानडी वळणाचं मराठी खूप आवडायचं. तसेच तरुण तडफदार नितीनकुमार माळी सर. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. "शिक्षक हा तमासगीर असतो" इति- नितीनकुमार. संबंध बी एड च्या कालावधीत मला न सुटलेलं कोडं म्हणजे अमोल रावते-आमल्या. त्याचा ठाव लागलाच नाही.
ना हस्ती है कुछ ना अदम हैं गालिब
क्या हैं तू ए नही हैं ।।
रविदास साळुंके (सा डुंके!) अत्यंत साधा, निखळ माणूस. पराकोटीचा आशावादी. Hz इतका कुणालाच कळला नसेल तो. पाच सप्टेंबर चं कळलं. अगदी सुन्न सुन्न झालं! शब्द हरवले. तोल ढळला! आणि खूप काही गमावलं. Hz, साळुंके व पी एन (पाटील) यांच्या रूमवर मी जायचो कधी कधी. साळुंके चं आदरातिथ्य लाजवाब होतं! धुळ्यावरून सप्तश्रृंगी माता गड (वणी) पर्यंत पायी चालत गेला होता. रूमवर वारंवार होणाऱ्या नॉन व्हेज पार्ट्या. पण हे सगळं कुठं तरी लांब विस्मृतीत गेलं होतं. संदीप वाकचौरे सरांचे वाचन, समज आणि विवेक सर्व काही अद्वितीय. तर हे सर्व कुवतीनुसार आणि सवडीप्रमाणे आपल्या साठी लिहिणार आहे. तळ ढवळण्याची सुरुवात तर झाली. पुढे भेटूच!
शिवनाथ अशोक तक्ते
९५९५६८७७६४
eshivprabhat@gmail.com

बा बसवा (कविता)

बा बसवा!
सांप्रदायिकतेच्या पल्याड विस्तीर्ण
मानव वस्त्यांच्या जंगलात धर्मचिकित्सेचे असंख्य
वणवे पेटवलेत तुम्ही.
मार्क्स आणि तुमच्यातला हाच तो धागा -चिकित्सेचा!
पण आपण दिलेल्या समतामूलक
मानवतावादी तत्त्वांचं पुढं
काय झालं? हे पाहायला तुम्ही नाहीत.
तशीही आपल्याकडं पंथांचा सुकाळू होताच.
त्यात आणखी एक भर म्हणून बसवतत्त्व!
वारकरी विट्ठलत्त्व, पंचशील बुद्धत्त्व, ग्रंथसाहेब,
अवैदिक जैनत्त्व,
सर्वार्थाने शिवाचा, मांगल्याचा
वाजवी आधार घेतलेला!
स्त्रीलाही मानवत्त्व मिळवून
देणारं विवेकी तत्त्व!
तसाच मानवी स्पर्श, संवेदना आणि असीम
मितीय शरणत्त्व! मानवत्त्व!
तुकोबा,रयतेचा राजा शिवबा, चोखोबा, जोतिबा आणि बाबा!
अनुभवमंटप ते संविधान व्हाया लोकशाही!
रक्तकल्याण(बसवकल्याण) ते महाड पर्यंतचा हा संघर्ष
मानवाचा, मानवाकडून, मानवतेसाठी!
-शिवनाथ अशोक तक्ते
९५९५६८७७६४
eshivprabhat@gmail.com

काहीतरी कर मित्रा! (कविता)

काहीतरी कर....मित्रा!
तू कुठवर असं वागवणार आहे
हे निराधार, बिनबुडाचं दुखणं?
कधी कधी तर्ररी देत चल त्यालाही.
हे अर्थहीन फुगणं, जीवाचा कोळसा करून घेणं अन
सतत शून्यातल्या तुझ्या अस्वस्थतेला
आतुरतेनं अतार्किक (कथार्टीक) भाग देणं!
आता तरी विसर, तुही कधी होतास तंतोतंत माणूस,
चार-चार महिने करायचास काथ्याकूट
तुझ्या अमुक तमुक परीक्षांसाठी!
बेचैन व्हायचास, मलूल व्हायचास
हमखास प्रत्येक निकालानंतर!
तुझं हे अवकाळी दुखणं आजकाल खूपच बळावलंय,
करपून चाललास तू प्रदीर्घ मृगजळी सावलीत!
हसू करतोयस तू
तुझ्या, माझ्या आणि सोज्वळ दिशांच्या
विश्वभानाचं!
© शिवनाथ तक्ते

जाणिवा


खऱ्या खुऱ्या जाणिवांच्या कोटी प्रक्रियांमध्ये स्वतःचा मुळमुळणाऱ्या असंख्य गुळमाट संवादांचा अर्थ शोधता येईल का ? बेट्यांनो नीट समजून घ्या. पुन्हा अडचण नको. कशाला उगाच हा थाट माट आणि वाट. काय हे? उगाचच. नाहीतर काय? सूड नेमका कोणावर उगवायचा हे कळायला वाट नाही. थोरामोठ्यांच्या खोट्या अस्मिता कुरवाळत बसतो आपण अन हाती काय राहते? कोणीच धुरीण ह्या आकलनाच्या प्रक्रियेत सहाय्य ठरू शकत नाही. म्हणजे या अर्थी बरंच काही बिनसलंय आपलं आतून.
आपण कुठून आणणार अहोत वाळलेल्या शेंगा आणि भिजलेल्या मंजिऱ्या? त्यापेक्षा एखादी गोष्ट सांगून मोकळं व्हावं एकदाचं! पण तसंही करता येत नाही एकाएकी. आहेत. सांगण्याजोग्या एक दोन गोष्टी आहेत माझ्या जवळ. पण वैतागलेल्या मनस्थिती वर काहीतरी रामबाण इलाज शोधावा लागेल. चार एक मोक्याच्या जागा हुडकाव्या लागतील.