Monday, August 12, 2019

मैत्रीच्या नावानं... चांगभलं!

पुनर्भेटीचे संकेत ...
साल: २००९
ठिकाण: ज्ञानगंगा विद्यालय, मांची हिल
वर्ग: ५ वी अ आणि ब
अर्थात मी ५ ब चा वर्गशिक्षक होतो. काही मुलांची नावं उदाहरणार्थ पुढील प्रमाणे:
रुपेश मालपाणी, रसिका बोरा, साबळे, जोंधळे, वैष्णवी उंबरकर, वैभवी इत्यादी. तसेच हजारे आणि वगैरे वगैरे! काही नावं बरोबर तर काही चुकलेलीही असतील. पण आशय तोच. सोबतीला पंढरीनाथ बाचकर, चिंधे, हजारे, जोशी, ताजने, मैड आणि बरीच महनीय शिक्षक मंडळी. रवी जानराव सुद्धा तेथेच भेटला. तसं बघायला हा आठवणींचा भलामोठा विस्तृत पट. आणि हो मेहजबिन सय्यद मॅडम! त्यांना कोण विसरेल? एकूण एक सर्वच अंगे ओळखीची. ज्यूदो कराटे प्रशिक्षक बनगइय्या थेटपर्यंत! मधले बरेच विस्कळीत. कवितेची आवड तेथूनच बळावलेली. असो. तर कारण एव्हढंच की वर्ग ५ब मधील एक बारीक पोरगा. भित्रा आणि कमी बोलणारा. पण स्मरणात राहील असाच. पण त्यावेळी तो स्मरणात राहील इतकाही ठसठशीत नव्हता. पण का कोण जाणे. मीच त्याच्या स्मरणात राहिलो असेन! अंक संपला. थोडक्यात गुंडाळता घ्यावा लागला. पुणेकर (गोळे) बाईंचे व्याख्यान. हॉस्टेलर्स साठीची मेस. विद्यार्थी स्वागत समारंभ. संध्याकाळच्या अभासवेळी करमणुकीखातर मी गायलेले ''तेरी दिवानी" गाणं. घटक चाचणी परीक्षा. सगळं सगळं पळवावं लागेल पुढे. किती पुढे? तर थेट शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत!
साल: २०१७-१८
ठिकाण: फिरोदिया महाविद्यालय, साकुर
वर्ग: वर्गच वर्ग. त्यातही बरेच वर्ग-सिद्धांत. नवं व्याकरण. नवी गणिते. आणि बऱ्यापैकी बसलेला जम. (कारण जून-जुलै २०१२ पासून फिरोदियातच! एकदा तंबू-गबाळ उचललं होतं पण मग पुन्हा नीट सरकवून बसवलेली घडी!) असो. अव्वल, अस्सल, अतरंगी आणि अनपेक्षित घोळक्यात भेटावा जुना त्याच्या बालपणातला माझा विद्यार्थी. हो मिस्टर संकेत पवार. विशेष म्हणजे शक्यता असते पण जग खूप मोठं असतं ह्या कल्पनेला छेद! प्रथम वर्ष विज्ञान वर्गात हा (संकेत) प्रवेशित. त्यात मूर्ती लहान आणि अजबच! जिजाबापू नान्नर(बापू) त्याची हमखास मजा घेणार! गोरखनाथ जाधवला अत्यंत भिणारा! जाधवांची तशी ख्यातीच! पण हे अचाट प्रकरण. बरं माझा आणि संकेतचा तसा रितसर संपर्क येणे शक्य नव्हते. कारण मी कला शाखेचा (इंग्रजीचा) प्राध्यापक. (इयत्ता बारावी नंतर विज्ञान शाखेशी रीतसर फारकत घेतलेली. पण तोच स्वतः होऊन माझ्याकडे आला व जुनी (ज्ञानगंगा विद्यालय) ओळख सांगितली. एकतर विश्वास बसत नव्हता आणि तो पण नीटसा आठवत नव्हता. पण मग त्याची अस्सल देहबोली. (डोळेच जास्त संवादी!) मग खात्री पटली की हा तोच 'संकेत'! मध्यंतरी केव्हातरी (नक्की केव्हा? हे महत्वाचे नाही. आणि गरजेचे त्याहूनही नाही) 'अग्नेयम' स्पर्धेसाठी सी एस आर डी(नगर) च्या एम बी ए कॉलेजमध्ये पाठविले. त्यात संकेत आणि हौशाबापू डोलनर(आणखी एक विक्षिप्त प्रकार!) यांना मुख-चित्रण (face-painting) करिता पाठविले. पण हौशाबापूला 'तोंड' आवरता येत नाही असं (राशीनकर आणि जाधव यांच्याकडून) कळलं! असो. नंतर असाच वार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रसंग! (अतिशय डोकेलिटी वापरून आकारास आणलेल्या) स्टेजवर तितक्याच बेभान अविर्भावात नाचणारा 'मयूर ताजने'. (तशी त्याने स्त्री-वेशात सादर केलेली लावणी बेष्टच. पण ते वेगळं प्रकरण! त्याबद्दल पुन्हा कधी. किंवा कधीही नाही!) बघता-बघता प्रेक्षकांमध्ये (अगदी उत्स्फूर्तपणे!) नाचणारा 'संकेत'चा डान्सर-संकेत जागृत झाला. तर म्हंटलं असा देखणा अविष्कार स्टेज वर दाखवावा! आणि बघता-बघता संकेत ने मयुर चा पत्ता कट केला. (मयुरचं भवितव्य अंधारात!) आणि आणखी बऱ्याच काही गमती-जमती. त्यानंतर दुसऱ्या वर्षाला संकेत कॉलेजच्या संकेतस्थळावर दिसेनासा झाला. नेमका कोठे प्रवेशित झाला कळलेच नाही! मध्यंतरी दाढ-आश्वी रोडला दाढच्या थोडं अलीकडे एका नर्सिंग पदविका अभ्यासक्रम जाहिरातीच्या फ्लेक्सवर मिस्टर संकेत पवार याचा फोटो!
तर मग ह्या अपेक्षित-अनपेक्षित भेटींचे 'संकेत' काय समजायचे?
आणि मग एक प्रश्न स्वतः साठी:
तुझे गुज 'संकेत' मजला उमगले?
विश्वासाच्या घट्ट आणि मजबूत ओल्या काथ्याप्रमाणेच (हो. बांधकामात 'पहाड' बांधताना हमखास आणि भरवशाचा समजला जाणारा काथ्या!) कित्येक माझ्यासारखे आणि संकेत सारखे मैत्रीचे बंध भक्कमपणे जोडले गेले असतील!
©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
ठिकाण:श्रीरामपूर (११ ऑगस्ट, २०१९, वेळ ११.५७(रात्रौ.)


1 comment:

  1. पुन्हा एकदा वाचून पाहिले खूप सुंदर लेख आहे.
    :संकेत पवार

    ReplyDelete