Monday, February 15, 2021

नानास

 #प्रा_नानासाहेब_गुंजाळ 

यांस:


एक    तुला   पाठवितो    कविता

त्या    कवितेचे   सोने    कर    तू 


तुझा   सुखी    सहवास  मिळू   दे

 एक      होऊ     दे  शब्द   तराने 


हात    तिचा    धर    घट्ट   पकडूनी

अजून   जरा   ती   अल्लड     आहे 


तार      सप्तकातून     घुमू    दे

साज  स्वरांनी     कवितेचे    घन


मध्य   आळवून     प्रदीर्घ     संयत  

फुलव   तिचे    असणे   आशयघन 


खोल   तुझ्या    खर्जात  खुलू   दे

कवि -   कवितेचे       एकाकीपण!


© *शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर*

Monday, February 1, 2021

कविता

 गाली खुदकन हसते तेव्हा

नितांत सुंदर दिसते कविता

स्वप्न पडावे भल्या पहाटे

तशी सुखावून जाते कविता


आयुष्याच्या कातरवेळी

स्वप्नांतून सावरते कविता

दुःखाने जो गहिवर येतो

त्या अश्रूंत मिसळते कविता


कड्या-कपारीतुन विलगल्या

कळपांतुनि हंबरते कविता

डोळ्यांमधुनि ओघळणाऱ्या

ताऱ्यांपरी लखलखते कविता


चिंच, आवळा अन बोरांना

आठवता आंबटते कविता

गंधित करतो जीव मोगरा

त्याहूनही मोहरते कविता


दाटून येता अभ्र अकाली

बीजलीसम लखलखते कविता

रानामधल्या मोरपिसांनी

वाऱ्यावर भिरभिरते कविता


रात रात भर जागून नंतर

पहाटता जन्मते कविता

डोळ्यांखाली अर्धवर्तुळे 

जमती तेव्हा कळते कविता 


भूलथापांना भुलते कविता?

अनुतापांना छळते कविता?

कुशल, प्रशिक्षित तरी उपेक्षित

अर्धपगारी, वेठबिगारी,

वांझ बौध्दिके झोडीत बसता,

अजिबात ना रमते कविता,

प्रश्नांना त्या भिडते कविता,

किंचित ना डगमगते कविता,

फाशीचेही दोर कापुनी

मुक्तपणाने जगते कविता.


छंद, बंध ना वृत्त-व्यंजने

त्यात अडकता घडते कविता

जीव जडावा आयुष्यावर

तशी अनामिक जुळते कविता 


हिशोब मांडून, अबीर सांडून

सुखावून धडधडते कविता

आयुष्यातील सार्थकतेने

डोळे मिटुनी सरते कविता

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर












Wednesday, November 25, 2020

झिम्मा!

 झिम्मा !!!


हातात दोर माझ्या देऊन तू फरारी 

रक्तास का पिपासू इथली उपासमारी? 

दु:खास पारखा रे अजूनी मुका मदारी 

चालू कशी अजूनी अधम्या तुझी मुजोरी?


देऊन टाक आता माझ्या जुन्या कट्यारी

मागे अजून आमच्या का वाजते तुतारी?

दुःखास वाढले मी ताटामध्ये नव्याने 

माझ्या खुनास टपले ते होऊनी फितुरी


वाटाघटी कराया तो काय साव झाला? 

रक्तास सांडताहे माझ्या कसे शिकारी!

संघर्ष आत होता मी झोपलो उपाशी,

 देऊन प्राण माझे मी जाहलो भिकारी!


पिऊन टाकले रे आधीच विष ज्याने, 

तो निलकंठ वाटे मजला मधुर भारी

दे यातना सुखांशी खेळून आज झिम्मा, 

ही वेळ येत नाही पुन्हा फिरून दारी


दारासमोर माझ्या ह्या सावल्या उन्हाळी 

घेऊन आत येती हातामध्ये पहारी 

मन चिंब चिंब भिजुनी येता दुपारवेळी

 तुम्हास या 'झळाया' का लागता जिव्हारी?


भोगास पात्र व्हाव्या माझ्या व्यथा नव्याने

 मी रोज 'डाव' देतो आत्म्यास शोककारी! 

कोणासही पडो ना माझी उगाच भ्रांती 

मी खूप दूर जातो घेऊन 'एकतारी'!


शिवनाथ अशोक तक्ते 9595687764/­eshivprabhat@gmail.co­m

Saturday, June 13, 2020

महंकाळेश्वरा!

प्रथांच्या वाळवंटात कुठेही जा
असमान धग दिसते अवती भोवती
शरीर विधींना समर्पित केल्याने
आत्म्याला सोन्याची झळाळी 
प्राप्त होईल, *महांकाळेश्वरा?
पैशाने मालमत्ता मिळवता
येईल
मालमत्तेमुळे लोकात बोलबाला
होईल,
पण श्रमाने माझ्यातील
तू संतुष्ट होशील,
महांकाळेश्वरा!
आंधळ्यास काठीचा आधार,
प्रवाश्यास सावलीचा आधार,
शेवटचे द्वार तुझ्याकडेच
खुलले जाणार,
तरीही लोक जातात
 तुझ्याऐवजी
लौकिक सुखलुप्त प्रदेशात,
महांकाळेश्वरा!

दोषांची पुनरावृत्ती टाळता येईल,
पण सदोष वर्तनाला माफी नको,
प्रत्येक बाजूचे गणित मांडता येईल
पण हिशोबात धरता येणाऱ्याआपुलकीच्या 
नात्यांची गोळाबेरीज बरोबर येईल,
महांकाळेश्वरा?

शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
* महांकाळेश्वर: आश्वी खुर्द  ता. संगमनेर जि. अ. नगर येथील महादेव (शिवलिंगाचे नाव)


Sunday, May 24, 2020

पंच/ शिष्टाचार प्रथा

पंच/ शिष्टाचार प्रथा 
मी दि. १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी अंदरसूल ता. येवला येथे माझ्या आतेबहिणीच्या लग्नसमारंभासाठी (खासकरून देवक- देवकार्य साठी) आलो होतो. तेथे 'पंचाला येणे', पंच बोलावणे आदी रीत-परंपरा असल्याचे कळले. लिंगायत समाजात असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. कारण अशी पद्धत मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिकरोड ह्या ठिकाणचे अपवाद वगळता इतरत्र कोठेही असल्याचे ऐकिवात नाही. आणि म्हणूनच ह्या  वैभवशाली परंपरेबद्दल लिहावं असं मला वाटलं. 
आपल्या रूढी, प्रथा आणि त्यांचे पूर्वापार चालत आलेले आपण सर्व पाईक. हा आपला वैभवशाली भूतकाळ आपल्याला सतत  आपले भविष्य आणि भवितव्य ठरविण्यासाठी प्रेरणा देतो. प्रेरणा, जाणिवा, नेणिवा यांची मूळं आपल्या प्रदीर्घ आणि पूर्वापार चालत आलेल्या, आणि आपण निष्ठेनं चालविलेल्या प्रथा-परंपरांमध्ये आहे. पंचाला येणे ही अशीच एक पद्धत आहे. हिलाच 'शिष्टाचार' असेही म्हणतात. लग्न, मुंज, अंत्यविधी इत्यादी साठी पुरोहित्य करणारे जंगम स्वामी सदर पंचाला येण्याचं निमंत्रण देतात. रात्री निवांत (०९:००-०९:३०) च्या दरम्यान लग्नघरी जमतात. ह्या शिष्टाचारचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडलेला असतो. तसेच ज्या घरी पंच बोलावले जातात त्यांनी पंचांना 'बाब' (एक ठराविक रक्कम!) देण्याची पद्धत आहे. समाजातील लोकांना लग्नपत्रिका देण्याची पद्धत नसल्याचे मला माहित होते. तसेच लिंगायत समाजातील बहुतांश लोक हे व्यापारी असल्याने त्यांना एकत्र आणण्याची ही एक आदर्श पद्धत आहे. समजाला ही मिळणारी रक्कम(बाब) समाज हितासाठी तसेच जंगम स्वामींना दक्षिणा देण्यासाठी केला जातो. पंच आल्यानंतर त्यांना पाणी, पानसुपारी, जाहीर आवतन देणे आणि शेवटी चहा देणे हा ह्या परंपरेचा भाग आहे. पंच बोलावणे (असणे) किंवा शिष्टाचार ही एकविसाव्या शतकातील 'सहविचार सभा' च असून त्या सभेचे मूळ १२व्या शतकातील 'शिवानुभवमंटप' ह्या आदर्श आणि आद्य लोकविचार सभेतच आहे असे म्हणावे लागेल!

Wednesday, May 6, 2020

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव! (कविता)

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव!

आपल्या खोट्या शपथांच्या पुण्याईवर 
जगू पाहणारे आपण एकजात भ्रष्ट प्राणीच,
नाहीतर काय! शुलिभंजन, देवगिरी, भद्रामारुती,
एवढंच काय बिकावू पदव्यांच्या आणि खैरातींच्या
बळावर बळकाविलेल्या जागा किंवा तत्सम प्रलोभनं
 सुद्धा थांबवू शकलं नाही आपल्याला क्षणभर.

झेंगाटखोर वातावरणात तापदायक वाटू लागलेल्या
कुटाळक्या, चहापान आणि मेजवान्याही 
करू नाही शकल्या आपल्याला डळमळीत किंचितही.
पीएचड्यांचे पेव आणि प्रबंधांचे भाव ऐकून
थोडा सुद्धा ढळला नाही तोल
याचं अजूनही नवल वाटत नाही,
एकूण एक हाही स्वप्नरंजित अविर्भावच!

नात्यांची, खानावळींची, मारुतीला घातलेल्या खेटांची,
आणि त्यातच भविष्यबद्दलची असलेली अनास्था
लपवू शकलो नाहीच आपण!
किमान स्वतः पुरता क्रूरपणा
राखीव ठेवता येतोच ना!
त्यात आणखी मोकळं आणि हलकं 
वाटण्यासारखं काय आहे?
खोटेपणाचा रेटा हा आपल्या
जीवनशैलीत आपण मिरवलेला
आणि जिरवलेला मूर्तिमंत क्रूरपणा.

बाकी अस्तित्वासाठीची अवीट धडपड,
महानगरांकडे वळवलेलं चित्त,
विद्यापीठीय घुमजाव, पंडित चौरासीयांचं 
बसरी वादन, आनंदसागर किंवा
सपाट फळ्याकडे पाठमान करून
नसती ओढाताण आणि उष्टावळ्या 
न काढण्याची द्विरुक्ती!

या सगळ्यात 'गझलांवर' निस्सीम
 प्रेम करणारे प्राध्यापक, 
त्यांच्या तंत्रज्ञानशून्यतेवर यथेच्छ
शेरे मारणारे आपण, 
आणि नित्यनेमाने मारुतीला माथा
टेकवणारे बुजुर्ग चाचा!
आणि याच्याही कितीतरी वर
थेट चैतन्याच्या परिसीमा भेदून 
गवसणी घालणारं निवृत्तीतलं
निस्सीम ज्ञान, मूर्तिमंत कोश
आणि ऋषितुल्य विद्यापीठ!

हे सगळं खोलवर, अत्यंत अटळ
आणि दाट विस्मृतीच्या वाटेवरील 
वास्तव, की विस्तव,
कि नेहमी प्रमाणेच--
बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव?

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,
सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)
जनसेवा  फौंडेशन लोणी बु संचलित 
कला व वाणिज्य महाविद्यालय, शेंडी (भंडारदरा) 
ता. अकोले, जि. अहमदनगर

Monday, March 30, 2020

पाय! (कविता)

पाय!

जळतो आहे माथ्यावर सूर्य 
कोपीष्ट मुद्रेनं
आणि तापलाय रस्ता, 
ओघळू लागलंय डांबर 
भयतालावर ...

स्थिर-स्थावर रस्ते आणि चौक मध्यावर 
अशांत प्रहरी जनजीवन विस्कळीत पण 
वाहतो आहे रस्ता आतून अदृश्य.

तरीही नजरेत न भरणारं, 
अंतःकरण पिळवटू न शकणारं दृश्य
चालू लागलेत पूर्णपणे विकसित
न झालेले इवले-इवले पाय
संबंध आयुष्याचा कोळसा झालेल्या
भेगाळ पावलांच्या पाठोपाठ...

पाठमोऱ्या आकृत्यांचा एकसारखा 
पाठलाग करणाऱ्या भयकंपग्रस्त सावल्या
जठराग्नी चेकाळून उठलाय आता
पण दशम्या तर केव्हाच झाल्या!

मग पाण्याचा एक एक घोट 
शोधणाऱ्या बोथट नजरा
दार बंद, आतून कड्या आणि 
मालिकांच्या शिर्षकगीतांचा धुमाकूळ!

पुन्हा नजर अनाठायी रस्त्यावर
एकेक पाऊल टाकत आपलं गाव 
जवळ करणाऱ्या ओसाड माणुसकीच्या
प्रदेशांतून पायपीट करणाऱ्या महामार्गी
पाणावलेल्या नजरा आणि कोरड्या घशाला 
समजावत आवंढा गिळणाऱ्या मार्गस्थ 
हातावर पोट आणि पृथ्वी टिकवणाऱ्या
हाडा-मांसाच्या पिढ्या...! 

शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
२९/०३/२०२०