Wednesday, May 6, 2020

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव! (कविता)

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव!

आपल्या खोट्या शपथांच्या पुण्याईवर 
जगू पाहणारे आपण एकजात भ्रष्ट प्राणीच,
नाहीतर काय! शुलिभंजन, देवगिरी, भद्रामारुती,
एवढंच काय बिकावू पदव्यांच्या आणि खैरातींच्या
बळावर बळकाविलेल्या जागा किंवा तत्सम प्रलोभनं
 सुद्धा थांबवू शकलं नाही आपल्याला क्षणभर.

झेंगाटखोर वातावरणात तापदायक वाटू लागलेल्या
कुटाळक्या, चहापान आणि मेजवान्याही 
करू नाही शकल्या आपल्याला डळमळीत किंचितही.
पीएचड्यांचे पेव आणि प्रबंधांचे भाव ऐकून
थोडा सुद्धा ढळला नाही तोल
याचं अजूनही नवल वाटत नाही,
एकूण एक हाही स्वप्नरंजित अविर्भावच!

नात्यांची, खानावळींची, मारुतीला घातलेल्या खेटांची,
आणि त्यातच भविष्यबद्दलची असलेली अनास्था
लपवू शकलो नाहीच आपण!
किमान स्वतः पुरता क्रूरपणा
राखीव ठेवता येतोच ना!
त्यात आणखी मोकळं आणि हलकं 
वाटण्यासारखं काय आहे?
खोटेपणाचा रेटा हा आपल्या
जीवनशैलीत आपण मिरवलेला
आणि जिरवलेला मूर्तिमंत क्रूरपणा.

बाकी अस्तित्वासाठीची अवीट धडपड,
महानगरांकडे वळवलेलं चित्त,
विद्यापीठीय घुमजाव, पंडित चौरासीयांचं 
बसरी वादन, आनंदसागर किंवा
सपाट फळ्याकडे पाठमान करून
नसती ओढाताण आणि उष्टावळ्या 
न काढण्याची द्विरुक्ती!

या सगळ्यात 'गझलांवर' निस्सीम
 प्रेम करणारे प्राध्यापक, 
त्यांच्या तंत्रज्ञानशून्यतेवर यथेच्छ
शेरे मारणारे आपण, 
आणि नित्यनेमाने मारुतीला माथा
टेकवणारे बुजुर्ग चाचा!
आणि याच्याही कितीतरी वर
थेट चैतन्याच्या परिसीमा भेदून 
गवसणी घालणारं निवृत्तीतलं
निस्सीम ज्ञान, मूर्तिमंत कोश
आणि ऋषितुल्य विद्यापीठ!

हे सगळं खोलवर, अत्यंत अटळ
आणि दाट विस्मृतीच्या वाटेवरील 
वास्तव, की विस्तव,
कि नेहमी प्रमाणेच--
बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव?

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,
सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)
जनसेवा  फौंडेशन लोणी बु संचलित 
कला व वाणिज्य महाविद्यालय, शेंडी (भंडारदरा) 
ता. अकोले, जि. अहमदनगर

No comments:

Post a Comment