Tuesday, August 9, 2022

पर्यवेक्षण

 विद्यापीठीय स्तरावरील परीक्षांचे पर्यवेक्षण (supervision) करत असताना आलेला अनुभव:


झालं असं की supervision करत होतो आणि हा विद्यापीठाचा पेपर (अत्यंत) सोपा काढल्याचं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून समजत होतं. ठळकपणे दिसून येत होतं. त्यांच्या नजरा सारख्या वरती आणि याचकाच्या भूमिकेतून आस लावून ( खास करून मुली!) ट-का-म-का पघत व्हत्या. जणू कोणीतरी आपणास मदत करावी, काहीतरी सांगावं, वगैरे. यावर एक शेर सुचला, तो पुढील प्रमाणे:


ता. क. थोडी मदत करतो...

(चाल: ये आंखे देखकर हम सारी दुनिया भुल जाते है)

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

''''''’'''''''''''''''''''''’''''''''''''’'''''''''’"""""""”"""""""""""


इन्ही हसरत भरी नजरों से थोड़ा पढ़ भी लेती तो

जरा भी वक्त ना मिलता तुम्हें यू गिड़गिड़ाने को


''''''’'''''''''''''''''''''’''''''''''''’'''''''''’"""""""”"""""""""""

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::


:- शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर

Monday, May 2, 2022

अर्करूप... तीर्थरूप!

 तीर्थरूप... अर्करूप!


मानेचं हाड बाक आल्यानं

अधिकच वाकलेलं 

रठ झालेलं,

शेवटाला माखलं

तुपाने गावरान...

गालाचे हाड वर आल्यानं

नाकाचा शेंडा अधिकच तरतरीत, 

पण तरीही

आखीव रेखीवपणा शाबूत

तंतोतंत!


खोल गेलेल्या आवाजातील 

जरब, क्षीण होत गेल्याची नोंद कोरलेली

मनपटलावर कायमचीच.

नंतरच्या बऱ्याच रात्री आणि

दिवसाही

ठसकलेला संथ आवाज

कानात घुमल्याचा भास होऊन गलबलून

आलं. वेडात निघालो त्यापायी. 


थापी, रंधा, नैल्या, वळंब्यात

कासावीस गुतलेला जीव,

त्याची घालमेल खूपदा बोलून 

दाखवलेली.

उभी जिंदगानी अगदी दोरीतलं जगणं,

'बांधकामात गहूभर देखील दोष असून चालत नाही'

ही त्यांच्यातील कारागिराची शिस्त

जणू पालुपदच!

शेवटून दुसऱ्या रात्रीचं अजब वागणं

थोर मनात साठवणं तसं मुश्किलच.

कधी नव्हे ती 

चहा सोबत खाल्लेली बिस्किटं

दिलासा देणारी ठरावीत इतकं

आशादायी चित्र रात्री सोबतच

गडद होत गेलेलं...


कोणती शपथ देत असेल त्याच्यासह 

त्याच्या आतील

हॅम्लेटला स्वतःच्या बापाच्या आतील 

हॅम्लेटच्या बापाचं भूत?

स्मरणांचं यथार्थ लिंपन

अवघ्या आयुष्याभोवतीच घातलेलं

अभावाच्या परिपक्वतेनं:

माणसाचं निरंतर 'पेटणं' हे 

विझण्यासाठीच. 

    ■ शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर



Monday, March 7, 2022

संमिलन हो भरले त्यांचे!

 तारेवरची कसरत नाही

संमेलन हो भरले त्यांचे

मोर्चा नाही चर्चेसाठी 

संमिलन हो भरले त्यांचे


तुटलेलेपण अनुभवलेल्या 

पिढ्या-पिढ्यांच्या  ऱ्हासाबद्दल 

टिपे गळणे ठरले त्यांचे


सगे-सोयरे बनून आपल्या

दुःखा बद्दल 

सुतक पाळणे ठरले त्यांचे


रहिवासाची स्थळे जयांनी 

लुबाडलेली त्यांच्यासाठी

 मौन पाळणे ठरले त्यांचे


खोपे, घरटे, ढोली मध्ये 

डाव मांडला

त्या झाडांची कत्तल आम्ही

निमूट पहिली


घरट्यासाठी जीव झिजविला 

ज्यांनी ज्यांनी

घरकुलावर बोलायचे 

ठरले त्यांचे


माणुसकीची घडी काहीशी

विस्कटलेली

कशी बसविली जाईल हेही

ठरले त्यांचे


अवशेषांवर चर्चासत्रे 

खूप रंगली

श्वासांसाठी बीज पेरणे 

ठरले त्यांचे


   ■ शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर



ही अविनाशी गाणी...

फुलांची डायरी केली  जराशी शायरी केली 

तुझे आयुष्य लिहिताना मनाची पायरी केली

●○●

आई कळते असे वाटते पण आई कळतेच कुठे?

मेंदूच्या पटलावर आता असेल का हो गाव तिचे

हजार जुळवू खिळे आपण छाप तरी उमटेल तिथे?

यातील सारे सारे घडते आई जेव्हा जाते 

रग लागते बेंबीला अन् नाळ ओढली जाते


ही अविनाशी गाणी ...,







●○●

काही रचना 'स्वरलतेच्या', आळवितो मी जेव्हा

आपसूक माझ्या डोळा येते, गंगौघाचे पाणी

उपकारांचे  नाही ओझे,  नक्षत्रांचे देणे

हिशोब नाही हा जुळणारा, ही अविनाशी गाणी

मी ओळींच्या नशिबी नाही,ओळी माझ्या नशिबी

रित्या कवींच्या समोर धरली, भरलेली फुलदाणी

अस्तित्वाची भिजकी माती उचलून घेतो हाती

पाठीमध्ये अधिकच झुकले इथले पाळीव प्राणी

टेकवतो मी माझा खांदा  अलगद 'डोली' खाली

मातृत्वाचे झरे आटती जेव्हा निजते लेणी

विस्तीर्ण नदीचा काठ रडावा अमृत कंठासाठी

आर्त स्वरांनी सरो लगोलग संध्याकाळ विराणी

●○●

 ■   शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर 

०७-०३-२०२२ ११:३३ रात्रौ

Thursday, May 20, 2021

भयशून्य ध्यास तारे!

 


भयशून्य ध्यास तारे



¶¶

तरसू नकोस आता, 

बरसू नकोस आता

उजळून टाक आता, 

हे आसमंत सारे

भयशून्य ध्यास तारे : शिवनाथ तक्ते


¶¶

विझवू नकोस आता, 

भिजवू नकोस आता

उधळून दे झळाळी, 

भयशून्य ध्यास तारे


¶¶

भुलवू नकोस आता,

झुलवू नकोस आता

विसळून घे पियाली

क्षण दोन धुंद व्हा रे


¶¶

उतरू नकोस आता,

कचरू नकोस आता

उचलून घे गळ्याशी

भयकंप अंध वारे


¶¶

पढवू नकोस आता,

कढवू नकोस आता

देह-कात विस्कटूनी

कळमुक्त वावरा रे

■■■

Monday, April 5, 2021

दिवस कसे भुर्रकन उडून जातात!

 



दिवस कसे भुर्रकन उडून जातात!

स्टार प्रवाह वर रात्री ०९.०० वाजता सुरु होणारी ‘मुलगी झाली हो’ मालिका पाहत असतो.  नेहमीचेच राग, लोभ, द्वेष आणि मत्सर यांसारखे भाव जवळपास सर्वच मालिकांच्या कथानकात असतातच असतात.  तर ह्या मालिकेतील ‘विलास पाटील’ हे पात्र ‘माऊ’ ला म्हणजेच आपल्या मुलीला पाहण्यात हरखून जातं. ज्या मुलीचं त्याने तोंडही कधी पाहिलेलं नसतं आणि जिच्या नशिबात बापाचे प्रेमाचे दोन शब्दही येत नसतात अशा विलास पाटलामध्ये झालेला बदल सुखावह आणि हळवेपणा उचंबळून आणणारा आहे.  “माऊ, मला तुझं बालपण कधी  अनुभवताच न्हाई आलं!’’ असं तो म्हणतो आणि आपण खूप मागे-मागे जाऊया असं तो माऊला म्हणतो. तिचे लाड करतो. तिला फुगे, खुळखुळा आणि कुल्फी घेऊन देतो. तिची हौस पुरवितो. आणि त्यातलाच विलासच्या तोंडचा संवाद आहे, “दिवस कसे भुर्रकन उडून जातात!”

हे असं मागे जाणं टेक्निकली शक्य नाहीये. पण खरंच “दिवस कसे भुर्रकन उडून जातात!” नाही? एवढंसं पिल्लू असलेली ‘परी’ (माझी मुलगी) अवघ्या एक तासांची असताना प्रसूतीगृहात भेटायला गेल्यावर माझ्याकडे तोंडात बोटं घालून भुटूभुटू पाहत असल्याचं जाणवलं. आता परी सात वर्षांची आहे. आणि अगदी ह्याच वेळी प्रदीप निफाडकर सरांची ‘माझी मुलगी’ ही गझल आठवते. 

आठवते मज माझी आई अशीच होती

जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी

तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू

अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी

हो तर मुलगी काय पटकन डोळ्यांदेखत मोठी होते. मग आपसूकच तिचे लाड करायला, तिच्याशी बोलायला आणि तिला खूप काही बोलायला लावण्याचा आणि तिच्याकडे एकटक पाहत निव्वळ ऐकत राहण्याचा प्रकार सुरु होतो. हे क्षण हातातून निसटून जातायेत असंच वाटायला लागतं राहून राहून. तशातच सोनू निगमने गायलेलं 'अभी मुझ में कही' छळू लागतं. बाप-लेकीच्या नात्यातला एक हळवा कोपरा असतोच. आणि 'बाप' म्हणून तेच तर आयुष्यभराचं संचित असतं! जसा 'आई होणं' हा सुखद आणि समृद्ध अनुभव असतो तसाच 'बाप होणं' हाही कृतार्थतेचा असीम अनुभव आहे. 'आई' सदोदित साठवून ठेवण्याचं राखीव कुरण म्हणजे मुलगी. म्हणूनच आईचं प्रेम कावरीबावरी झालेल्या मुलीच्या डोळ्यांत शोधण्याचा नितळ सुखाचा क्षण दुसरा कुठलाच नाही. 

वडील (अगदी शेवटच्या दिवसांतही!) अत्यावस्थ असताना दवाखान्यातील नर्सने आपसूक विचारलेला प्रश्न किती बोलका होता हे नंतर लक्षात आलं. वडिलांना लघवी आणि संडासवर नियंत्रण न राहिलेल्या दिवसांत होणारा त्रास हा असह्य होता तसेच त्यांना स्वतःलाही ह्या गोष्टीची सल होतीच. आई आणि बायको नंतर केवळ मुलगीच हे सर्व करू शकते. आणि ते सर्व आपण मुलगा म्हणून तितक्या सुसह्यपणे कधीच करू शकणार नसतो. नर्सचे हे बोल अत्यंत खरे होते. शेवटच्या दिवसांत अण्णांच्या (वडिलांच्या) डोळ्यांतून अविरतपणे वाहणाऱ्या अश्रुधारा आपण थांबवू शकत नव्हतोच. मुलींच्या भेटीसाठी आसुसलेले वडिलांचे डोळे डबडबलेलेच असलेले मी पाहिले. 

रमजान मुल्ला यांची 'मुलगी म्हणजे...' ही कविताही अंतःकरणाचा तळ गाठणारी आहे.     

 मुलगी म्हणजे गुज बोलते 

    अळवावरचे पाणी ग

            सांडून जाते एक दिवस ती

       पुन्हा रित्याचे जगणे ग

आणि ही कविता मुल्ला यांच्याच आवाजात ऐकल्यावर डोळे पाणावले नाही असे होणारच नाही. बरं ही कविता अगदी तशीच (कवी सारखी) सादर करणेही मुश्किल! खुद्द मलाही दोन-तीन वेळा ही कविता सादर करताना गलबलून आलं होतं. 

बाप-मुलीचं नातं हे हळवेपणा बरोबरच प्रगल्भतेचं धूसर शिखर असतं. माझी दोन वर्षांची 'श रं न्या' ही माझ्या हालचाली न्याहळत असते. शेताकडे गरका द्यायला मी तिला सोबत घेऊन जात असतो. माझ्या मनात चालणारे विचार कदाचित तिच्याही मनात चालत असावेत असंही राहून राहून वाटतं. || जेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती || तसेच ह्याच नोटवर लतादीदींनी गायिलेलं 'मेरा साया साथ होगा' बॅकग्राऊंडला कितीतरी वेळ चालूच राहतं. 

         २०१२-१३ च्या दरम्यान सेट-नेट साठी अभ्यास करताना चौदाव्या शतकातील एका आंग्लकवितेची नोंद मार्गारेट ड्रॅबल संपादित ऑक्सफर्ड कंपॅनिअन मध्ये आली होती. 'पर्ल' (Pearl Poem) नावाची ही १४व्या  शतकातील तब्बल १,२१२ ओळींची अष्टावयवी ओळींची (Octosyllabic lines) अनुप्रासिक (alliterative) कविता असून त्या कवितेच्या कवी बद्दल फारशी माहिती मिळत नाही. परंतु पेशन्स (patience) आणि सर ग्वाइन अँड द ग्रीन नाईट (Sir Gawain and the Green Knight) ह्या निनावी कवितांच्या समकालीन असलेली 'पर्ल' ही कविता आहे. पर्ल हे त्या कवीच्या मुलीचं नाव असून दोन वर्षांची (किंवा त्याहीपेक्षा लहान) असताना तिचे निधन होते. आणि ज्या बागेत त्या मुलीचा पार्थिव देह दफन केलेला असतो त्या बागेत हा कवी दुःखविवशतेने भटकत असतो. तेथे त्याला झोप लागते. स्वप्नात त्याला एक नदी दिसते आणि नदीपल्याड परादिस (Paradise) असून त्याला तेथे एक युवती दिसते. आणि तो तिला ओळखतो की ती आपलीच मुलगी आहे. ती युवती (म्हणजेच त्याची मुलगी) त्याच्या अतीव दुःखाबद्दल तीव्र रागाने सुनावते आणि त्याबरोबरच कृपावंत स्थिती बद्दलही सांगते. परंतु तो त्या स्वर्गातील 'सम्राज्ञी'बरोबर ह्या 'अजब' न्यायाविषयी हुज्जत घालतो, भांडतो. तिला भेटण्याच्या विचाराने तो त्या नदीत उडी घेतो आणि पोहून पैलथडीला पोहचण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यातच त्याचे स्वप्न भंगते आणि तो खडबडून जागा होतो आणि स्वतःला दिलासा देतो. ह्या 'स्वप्न' प्रसंगामुळे त्याचा ईश्वरावरील विश्वास पुनः प्रस्थापित होतो.

       हे दोन्ही-तिन्ही patches वेगवेगळे असूनही एकमेकांत गुंतलेले आणि पराकोटीचे प्रासंगिक वाटतात. बऱ्याच दिवसांपासून हे अस्फुट विचार मनात आकारशून्य आणि टोकहीनपणे तरंगत होते. पण 'मुलगी झाली हो' च्या निमित्ताने त्यांना आकार आणि टोक मिळाले!

                     दिवस कसे भुर्रकन उडून जातात...

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,

सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी,

श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी.

९५९५६८७७६४

eshivprabhat@gmail.com


Saturday, March 27, 2021

पिंड!

 






पिंड!

                     कालच कल्याणकर मावशी गेल्याचं कळलं. ऐकून थोडं सुन्न आणि हळवेपण आलं. कल्याणकर मावशी. एक अजबच रसायन म्हणायला हवं. परक्या गावात आपसूक आई भेटावी अशी आईसारखी काळजी करणारयापैकी ती एक होत. जून २०१२ मध्ये फिरोदिया महाविद्यालयात (साकुर) येथे रुजू झालो. तेव्हा तिच्याकडेच मी एक मेस मेंबर म्हणून कनेक्ट झालो. माझ्याबरोबर असलेले राजेंद्र हिंगे यांचा आणि मावशीचा विशेष लोभ असल्याचे समजले. म्हातारी राजूला मुलासारखं मानायची. ती म्हणायची की “माझे दोन चीर (लेक) तसा हा एक पीर.” राजू नेहमी मावशीला आई म्हणूनच संबोधायचा. मावशीचा स्वभाव हा शैलीदारच होता. संत आसाराम बापूंवर तिची विशेष भक्ती. त्यांच्याविषयी एक अपशब्दही ती सहन करायची नाही. 

 तर हा राजू तिला लाडीगोडी लावून पळीभर भाजी, कोरभर पोळी खायला घ्यायचा. नाश्ता करायच्या टायमालाही तेच. आणि पैशाची मागणी केल्यावर तो (जोडीला आल्हाट सरही!) तिला गाणं म्हणायला सांगायचे. “मावशी तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्ही एखादं छानपैकी गाणं म्हणा ना. आणि हो ते ‘देव जरी मज कधी भेटला’ हे अवश्य म्हणा.” एवढ्या बोलण्याने म्हातारी पार पघळायची. अन पैसे मागायचं विसरून जायची. मनाने तशी खूप चांगली होती मावशी. तिच्या स्वयंपाकाची तारीफ केलेली तिला खूप आवडायची. (आणि हो! पुरणपोळी तर फारच झाक बनवायची ती. मी बायकोला नेहमी तिच्या हातच्या पुरणपोळीचं उदाहरण द्यायचो. आणि त्यावरून होणारं रामायण हे वेगळंच!) एकमेकांच्या संगतीत आमचं मन खूप छान रमायचं. आल्हाट सरांना ती ‘लल्ल्हाटी सर’ म्हणायची. पण करंडे (दि पी कारंडे) चा का राग-राग करायची हे काय मला कळलंच नाही. सुभाष वडितके, मयूर पचपिंड मी, आणि दिलीप कारंडे हे मावशीकडे मेस मेंबर होतो.

 मावशीला बोलायला फार आवडायचं. सर्वांची (जरा) जास्तच आपुलकीनं चौकशी करायची. लग्न न झालेल्या स्टाफ मेम्बर्स बद्दल तिला अतिशय कणव होती. लग्न जमावं या साठी ती तर्हे-तर्हेचे उपाय (व्रत) सांगायची. मला तर तिने पाच सोमवारी महादेवाच्या पिंडीवर गहू वहायला सांगितले होते. (एका सोमवारातच मला गुण आला! लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी १३/०२/२०१४ ला कॉलेजवर आणि थेट कॅन्टीनला मावशीला भेटायला गेलो होतो.) महाविद्यालयात खेळाचे सामने असताना मी समालोचन करायचो. तेव्हा मधे-मधे चित्रपटातली गाणी लावायचो. तर काही वेळा मी मावशीला गवळणी म्हणायला लावायचो. तेव्हा न लाजता, न घाबरता ती गाणे म्हणायची.

  २६ जानेवारी २०१४ ला जेव्हा मी काही कारणांनी फिरोदिया कोलेज सोडलं. त्यावेळी तिलाही माझी जरा हळहळ वाटली. (३१/०२/२०१९ ला पुन्हा एकदा साकुर सोडलं. पण तेव्हा मला मावशीला भेटता आलं नाही!) मध्यंतरी कॉलेजमधील नामदेव पवार, विजय सोनवणे, नितीन गोर्डे, शंकर राशिनकर, दत्तात्रय आसवले, सचिन घोलप(प्राचार्य) इत्यादी प्राध्यापक मंडळी आणि आरजू शेख, आशा मुन्तोडे, मुक्ता चितळकर, मोहिनी आल्हाट व नवले म्याडम इत्यादी प्राध्यापिकांचीही मेस त्यांच्याकडे चालू होती. अधून मधून मावशीची भेट व्हायची. कधी कधी ती स्टाफ क्वार्टरला यायची. सर्वांची विचारपूस करायची. चार-पाच वर्षांपूर्वी ती जाम आजारी पडली होती. त्यामुळे तिला मेसही बंद करावी लागली होती. (आता काय म्हातारी जगत नाही असं वाटलं. पण तिनं तेव्हा आजाराला पिटाळून लावलं!) तशी आताही शेवटी शेवटी आजारी असल्यामुळं तिला मेस बंद करावी लागली होती. माझा मेसचा प्रश्न संपला होता. परंतु कोलेजात वेगवेगळ्या प्रसंगी (बहि:शाल व्याख्यानमाला वगैरे) मला तिला फोन करून डब्यांचं सांगावं लागायचं. “डब्यामध्ये गोड काय देऊ?” असं ती आवर्जून विचारायची. ती मेसच्या डब्याचे इतरांपेक्षा जास्त पैसे आकारायची. पण तेवढ्यासाठी नामदेवराव पवार तिची मेस सोडून इतरत्र जाण्याचा विचारही करत नव्हते. (त्यांना वाटायचं की तेवढाच म्हातारीला आर्थिक आधार होईल!) 

 शेवटी माणूस एकमेकांच्या आधारानेच जगत असतो. फक्त तो आधार विश्वसनीय असावा एवढीच आपली अपेक्षा असते. दोन मुलं, सुना, नातवंडे, नवरा(नाना) आदि गणगोत तिला होतंच. पण आमचीही ती अगदी जवळच्या (पोटाच्या) नात्याची होती. नाना आणि तिच्यात लुटुपुटूची भांडणं व्हायची. नानाला दुकानातून आणि बाजारातून सामान-भाजीपाला आणायला जावं लागायचं. आणि त्यांची नकार द्यायची टाप होत नव्हती. शेवटी शेवटी मावशीला भेटायला जायची इच्छा व्हायची पण वेळ मिळत नव्हता. (गोरखनाथ जाधव, शंकर राशिनकर, आणि मी (हे चोर लोक!) आमच्या तिघांच्याही बायकांना हाच प्रश्न छळायचा की “फक्त ह्यांनाच काय ती कॉलेजात कामं असतात. नेहमी कोलेजला वाहून घेतेलेले वगैरे वगैरे.) तर असो. मावशीला-कल्याणकर मावशीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तिच्या आत्म्याला चिरशांतीचे दान मागतो.

आता काय ‘ती’ महादेवाची पिंड आणि ही ‘कावळा’ शिवायची पिंड हाच काय तो संदर्भ उरलाय!  

💐💐💐 #१२/०२/२०१९