••• गुरू रूप •••
तळ स्थिर, कळ स्थिर, उगम स्थिर
आणि विसावाही स्थिर
स्थिरपणाची व्याख्याही स्थिर
नित्याचे अरण्यासक्त आवाज
कोलाहलप्रिय नियम डावलून
सुस्थिर तत्वांच्या तळाशी
सांगोपांग ज्ञानमुद्रेत स्थिर
हे कुठल्या राशीचे? कुठल्या देशीचे?
की हे परिमाणशून्य?
यांच्या हातीही शून्य अन् विश्वाची
उत्पत्तीही शून्यातूनच...
म्हणजेच तळापासून...
निढळापासून...
प्रश्नांकित मळभापासून
चैतन्याच्या ओथंबांचा
जलप्रपात...
एकूण एक अनादी अनंत
आकार, चिन्ह, अस्तित्व-नास्तित्व
यांच्या अलिकडले आणि
पलीकडलेही.
अरुपाचे अर्करूप
व्याकरण म्हणजेच गुरू रूप
बाकी सर्व
अव्यक्त, अपूर्ण, असंचयी
लघु रूप!
त्यातही
मग आपण कोण?
जर मान्य केलं तर
नास्तित्वाच्या अस्तित्वाचे
पराग कण अथवा त्यांचेही
अस्थिर अभास!
•••••
© शिवनाथ तक्ते