पंच/ शिष्टाचार प्रथा
मी दि. १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी अंदरसूल ता. येवला येथे माझ्या आतेबहिणीच्या लग्नसमारंभासाठी (खासकरून देवक- देवकार्य साठी) आलो होतो. तेथे 'पंचाला येणे', पंच बोलावणे आदी रीत-परंपरा असल्याचे कळले. लिंगायत समाजात असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. कारण अशी पद्धत मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिकरोड ह्या ठिकाणचे अपवाद वगळता इतरत्र कोठेही असल्याचे ऐकिवात नाही. आणि म्हणूनच ह्या वैभवशाली परंपरेबद्दल लिहावं असं मला वाटलं.
आपल्या रूढी, प्रथा आणि त्यांचे पूर्वापार चालत आलेले आपण सर्व पाईक. हा आपला वैभवशाली भूतकाळ आपल्याला सतत आपले भविष्य आणि भवितव्य ठरविण्यासाठी प्रेरणा देतो. प्रेरणा, जाणिवा, नेणिवा यांची मूळं आपल्या प्रदीर्घ आणि पूर्वापार चालत आलेल्या, आणि आपण निष्ठेनं चालविलेल्या प्रथा-परंपरांमध्ये आहे. पंचाला येणे ही अशीच एक पद्धत आहे. हिलाच 'शिष्टाचार' असेही म्हणतात. लग्न, मुंज, अंत्यविधी इत्यादी साठी पुरोहित्य करणारे जंगम स्वामी सदर पंचाला येण्याचं निमंत्रण देतात. रात्री निवांत (०९:००-०९:३०) च्या दरम्यान लग्नघरी जमतात. ह्या शिष्टाचारचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडलेला असतो. तसेच ज्या घरी पंच बोलावले जातात त्यांनी पंचांना 'बाब' (एक ठराविक रक्कम!) देण्याची पद्धत आहे. समाजातील लोकांना लग्नपत्रिका देण्याची पद्धत नसल्याचे मला माहित होते. तसेच लिंगायत समाजातील बहुतांश लोक हे व्यापारी असल्याने त्यांना एकत्र आणण्याची ही एक आदर्श पद्धत आहे. समजाला ही मिळणारी रक्कम(बाब) समाज हितासाठी तसेच जंगम स्वामींना दक्षिणा देण्यासाठी केला जातो. पंच आल्यानंतर त्यांना पाणी, पानसुपारी, जाहीर आवतन देणे आणि शेवटी चहा देणे हा ह्या परंपरेचा भाग आहे. पंच बोलावणे (असणे) किंवा शिष्टाचार ही एकविसाव्या शतकातील 'सहविचार सभा' च असून त्या सभेचे मूळ १२व्या शतकातील 'शिवानुभवमंटप' ह्या आदर्श आणि आद्य लोकविचार सभेतच आहे असे म्हणावे लागेल!