Monday, September 26, 2022

तुला बरे जमायचे...


गालात गोड हासणे 

तुला बरे जमायचे 

डोळ्यातली शराब हाय 

बेहोश धुंद व्हायचे


कळूनही कळेचना 

मामला मनातला

चाहूल येतसा उगा

तुझ्याकडे पहायचे


व्हठ हे नाही जणू 

गुलाबपंखुड्याच ह्या

जाहली ऐसी तऱ्हा

हा जीव झाला बावरा


केशी तुझ्याच गुंतला

अत्तर सुगंधी मोगरा

दाटले आभाळ काळे 

हे तुला सांगायचे


पाहिले जेव्हा मला 

देऊन मानेला वळण

राहून गेले बघ कसे 

चेहरा तुझा बघायचे


आणखीच अडकत चालली 

माझी तुझ्यात स्पंदने

कानात माझ्या वाजती

मनलाजरी तव पैंजणे


उन्हात खोंड मिरवता

का आम्ह्या जळायचे?

चोरून पाहतो तुला, 

तुला बरे कळायचे?


राहिल्या ह्यांच्या सह्या, 

ह्यांनी उठविल्या वावडया

त्यांनाच बांधा तोरणे

ज्यांचे अजून व्हायचे!

••••

शिवनाथ अशोक तक्ते