Monday, April 5, 2021

दिवस कसे भुर्रकन उडून जातात!

 



दिवस कसे भुर्रकन उडून जातात!

स्टार प्रवाह वर रात्री ०९.०० वाजता सुरु होणारी ‘मुलगी झाली हो’ मालिका पाहत असतो.  नेहमीचेच राग, लोभ, द्वेष आणि मत्सर यांसारखे भाव जवळपास सर्वच मालिकांच्या कथानकात असतातच असतात.  तर ह्या मालिकेतील ‘विलास पाटील’ हे पात्र ‘माऊ’ ला म्हणजेच आपल्या मुलीला पाहण्यात हरखून जातं. ज्या मुलीचं त्याने तोंडही कधी पाहिलेलं नसतं आणि जिच्या नशिबात बापाचे प्रेमाचे दोन शब्दही येत नसतात अशा विलास पाटलामध्ये झालेला बदल सुखावह आणि हळवेपणा उचंबळून आणणारा आहे.  “माऊ, मला तुझं बालपण कधी  अनुभवताच न्हाई आलं!’’ असं तो म्हणतो आणि आपण खूप मागे-मागे जाऊया असं तो माऊला म्हणतो. तिचे लाड करतो. तिला फुगे, खुळखुळा आणि कुल्फी घेऊन देतो. तिची हौस पुरवितो. आणि त्यातलाच विलासच्या तोंडचा संवाद आहे, “दिवस कसे भुर्रकन उडून जातात!”

हे असं मागे जाणं टेक्निकली शक्य नाहीये. पण खरंच “दिवस कसे भुर्रकन उडून जातात!” नाही? एवढंसं पिल्लू असलेली ‘परी’ (माझी मुलगी) अवघ्या एक तासांची असताना प्रसूतीगृहात भेटायला गेल्यावर माझ्याकडे तोंडात बोटं घालून भुटूभुटू पाहत असल्याचं जाणवलं. आता परी सात वर्षांची आहे. आणि अगदी ह्याच वेळी प्रदीप निफाडकर सरांची ‘माझी मुलगी’ ही गझल आठवते. 

आठवते मज माझी आई अशीच होती

जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी

तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू

अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी

हो तर मुलगी काय पटकन डोळ्यांदेखत मोठी होते. मग आपसूकच तिचे लाड करायला, तिच्याशी बोलायला आणि तिला खूप काही बोलायला लावण्याचा आणि तिच्याकडे एकटक पाहत निव्वळ ऐकत राहण्याचा प्रकार सुरु होतो. हे क्षण हातातून निसटून जातायेत असंच वाटायला लागतं राहून राहून. तशातच सोनू निगमने गायलेलं 'अभी मुझ में कही' छळू लागतं. बाप-लेकीच्या नात्यातला एक हळवा कोपरा असतोच. आणि 'बाप' म्हणून तेच तर आयुष्यभराचं संचित असतं! जसा 'आई होणं' हा सुखद आणि समृद्ध अनुभव असतो तसाच 'बाप होणं' हाही कृतार्थतेचा असीम अनुभव आहे. 'आई' सदोदित साठवून ठेवण्याचं राखीव कुरण म्हणजे मुलगी. म्हणूनच आईचं प्रेम कावरीबावरी झालेल्या मुलीच्या डोळ्यांत शोधण्याचा नितळ सुखाचा क्षण दुसरा कुठलाच नाही. 

वडील (अगदी शेवटच्या दिवसांतही!) अत्यावस्थ असताना दवाखान्यातील नर्सने आपसूक विचारलेला प्रश्न किती बोलका होता हे नंतर लक्षात आलं. वडिलांना लघवी आणि संडासवर नियंत्रण न राहिलेल्या दिवसांत होणारा त्रास हा असह्य होता तसेच त्यांना स्वतःलाही ह्या गोष्टीची सल होतीच. आई आणि बायको नंतर केवळ मुलगीच हे सर्व करू शकते. आणि ते सर्व आपण मुलगा म्हणून तितक्या सुसह्यपणे कधीच करू शकणार नसतो. नर्सचे हे बोल अत्यंत खरे होते. शेवटच्या दिवसांत अण्णांच्या (वडिलांच्या) डोळ्यांतून अविरतपणे वाहणाऱ्या अश्रुधारा आपण थांबवू शकत नव्हतोच. मुलींच्या भेटीसाठी आसुसलेले वडिलांचे डोळे डबडबलेलेच असलेले मी पाहिले. 

रमजान मुल्ला यांची 'मुलगी म्हणजे...' ही कविताही अंतःकरणाचा तळ गाठणारी आहे.     

 मुलगी म्हणजे गुज बोलते 

    अळवावरचे पाणी ग

            सांडून जाते एक दिवस ती

       पुन्हा रित्याचे जगणे ग

आणि ही कविता मुल्ला यांच्याच आवाजात ऐकल्यावर डोळे पाणावले नाही असे होणारच नाही. बरं ही कविता अगदी तशीच (कवी सारखी) सादर करणेही मुश्किल! खुद्द मलाही दोन-तीन वेळा ही कविता सादर करताना गलबलून आलं होतं. 

बाप-मुलीचं नातं हे हळवेपणा बरोबरच प्रगल्भतेचं धूसर शिखर असतं. माझी दोन वर्षांची 'श रं न्या' ही माझ्या हालचाली न्याहळत असते. शेताकडे गरका द्यायला मी तिला सोबत घेऊन जात असतो. माझ्या मनात चालणारे विचार कदाचित तिच्याही मनात चालत असावेत असंही राहून राहून वाटतं. || जेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती || तसेच ह्याच नोटवर लतादीदींनी गायिलेलं 'मेरा साया साथ होगा' बॅकग्राऊंडला कितीतरी वेळ चालूच राहतं. 

         २०१२-१३ च्या दरम्यान सेट-नेट साठी अभ्यास करताना चौदाव्या शतकातील एका आंग्लकवितेची नोंद मार्गारेट ड्रॅबल संपादित ऑक्सफर्ड कंपॅनिअन मध्ये आली होती. 'पर्ल' (Pearl Poem) नावाची ही १४व्या  शतकातील तब्बल १,२१२ ओळींची अष्टावयवी ओळींची (Octosyllabic lines) अनुप्रासिक (alliterative) कविता असून त्या कवितेच्या कवी बद्दल फारशी माहिती मिळत नाही. परंतु पेशन्स (patience) आणि सर ग्वाइन अँड द ग्रीन नाईट (Sir Gawain and the Green Knight) ह्या निनावी कवितांच्या समकालीन असलेली 'पर्ल' ही कविता आहे. पर्ल हे त्या कवीच्या मुलीचं नाव असून दोन वर्षांची (किंवा त्याहीपेक्षा लहान) असताना तिचे निधन होते. आणि ज्या बागेत त्या मुलीचा पार्थिव देह दफन केलेला असतो त्या बागेत हा कवी दुःखविवशतेने भटकत असतो. तेथे त्याला झोप लागते. स्वप्नात त्याला एक नदी दिसते आणि नदीपल्याड परादिस (Paradise) असून त्याला तेथे एक युवती दिसते. आणि तो तिला ओळखतो की ती आपलीच मुलगी आहे. ती युवती (म्हणजेच त्याची मुलगी) त्याच्या अतीव दुःखाबद्दल तीव्र रागाने सुनावते आणि त्याबरोबरच कृपावंत स्थिती बद्दलही सांगते. परंतु तो त्या स्वर्गातील 'सम्राज्ञी'बरोबर ह्या 'अजब' न्यायाविषयी हुज्जत घालतो, भांडतो. तिला भेटण्याच्या विचाराने तो त्या नदीत उडी घेतो आणि पोहून पैलथडीला पोहचण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यातच त्याचे स्वप्न भंगते आणि तो खडबडून जागा होतो आणि स्वतःला दिलासा देतो. ह्या 'स्वप्न' प्रसंगामुळे त्याचा ईश्वरावरील विश्वास पुनः प्रस्थापित होतो.

       हे दोन्ही-तिन्ही patches वेगवेगळे असूनही एकमेकांत गुंतलेले आणि पराकोटीचे प्रासंगिक वाटतात. बऱ्याच दिवसांपासून हे अस्फुट विचार मनात आकारशून्य आणि टोकहीनपणे तरंगत होते. पण 'मुलगी झाली हो' च्या निमित्ताने त्यांना आकार आणि टोक मिळाले!

                     दिवस कसे भुर्रकन उडून जातात...

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,

सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी,

श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी.

९५९५६८७७६४

eshivprabhat@gmail.com