१
प्रथांच्या वाळवंटात कुठेही जा
असमान धग दिसते अवती भोवती
शरीर विधींना समर्पित केल्याने
आत्म्याला सोन्याची झळाळी
प्राप्त होईल, *महांकाळेश्वरा?
२
पैशाने मालमत्ता मिळवता
येईल
मालमत्तेमुळे लोकात बोलबाला
होईल,
पण श्रमाने माझ्यातील
तू संतुष्ट होशील,
महांकाळेश्वरा!
३
आंधळ्यास काठीचा आधार,
प्रवाश्यास सावलीचा आधार,
शेवटचे द्वार तुझ्याकडेच
खुलले जाणार,
तरीही लोक जातात
तुझ्याऐवजी
लौकिक सुखलुप्त प्रदेशात,
महांकाळेश्वरा!
४
दोषांची पुनरावृत्ती टाळता येईल,
पण सदोष वर्तनाला माफी नको,
प्रत्येक बाजूचे गणित मांडता येईल
पण हिशोबात धरता येणाऱ्याआपुलकीच्या
नात्यांची गोळाबेरीज बरोबर येईल,
महांकाळेश्वरा?
शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
* महांकाळेश्वर: आश्वी खुर्द ता. संगमनेर जि. अ. नगर येथील महादेव (शिवलिंगाचे नाव)