Monday, November 11, 2019

कातळ हृदया रूप गर्विनी (La Belle Dame Sans Merci- Keats)


 【La Belle Dame Sans Merci: A Ballad
      BY JOHN KEATS】
कातळ हृदया रुप गर्वीनी

हिंडतो कारे उदासी? काय हे दुखणे उराशी?
सांग सरदारा तू सगळे, भीड ना धरता जराशी
गवतही सुकले तळ्यातील, पक्षीही ना गात काही
का बरे फिरतो भनंगी, जाळी तव अंगास लाही
  २
आधीच करुनि ठेविला गोळा शिधा खारूई नी
कामे सुगीची उलगली, आली सुबत्ता धावुनी
कुरवाळण्या दुःखार्त क्षण  येतो हिवाळा दचकूनि
दुःखजर्जर का तरींही  हे तुझे मुखचंद्र म्लानी?
   ३
खिजविती दुःखार्त तुजला तप्त ओल्या वेदना
दिसतसें निढळावरी तव  एक फुल पांढुरके
कोमेज-गाली का गुलाबी ही फुले दृष्टीस पडती
मृत्यूपंथा जातसें निर्ढावुनी आपसूक मुके

मोकळा तो जाहलाअन बोलला त्याची व्यथा
"पाचूच्या सुंदर बनी मज एक ललना भेटली,
परिकन्या ती अतीव मादक शरीरभर मोहरली,
सतेज कांती, नाजूक पाऊल, नयनदलेंही मंतरलेली;

मुकुटहार अर्पून प्रियेला, अप्रतिम मनगट्या बनविल्या
उच्च सुवासिक सुगंध दरवळ चहुबाजूंनी केला उजागर
तिने पाहिले मज ऐसेकी माझ्यावर ती लट्टू झाली
व्यक्त जाहली ती ललना मग छेडून तारा तीव्र स्वरावर

बसविले मग मी तिला भरधाव घोड्यावर पुढें
पाहिले नाही आणिक तिच्याविणा मी दिवसभर
 आळविल्या ताना तिनें  वळूनीया माझ्याकडे
अन गायिली  परिसंस्कृतीची व्यंजने,गौरवगीते

मधुर चवीची कंदमुळे ती माझ्यासाठी घेऊन आली
फळा-फुलांचा स्निग्ध अर्क अन मधुकर रुजकर  देती झाली
अजब अनामिक भाषेमधुनी बोलून गेली तिची कथा ती
ध्वनी उमटला त्या भाषेतून, "माझी तुजवर जडली प्रीती"

वनदेवींच्या गुहेत घेऊन गेली आत मला ती झपकन,
शोक अनावरतेने रडली अपार दुःखी-कष्टी निरंतर,
गदगद हललो शोक-आलापी त्या मुद्रेने  मीही आतून
चुंबनचातुष्टयाने मिटलीं नयनेदलें मी मंतरलेली

गूढप्रसंगी जोजवले मज त्या ललनेने, मी निद्राधीन
स्वप्न पाहिले, त्यात पाहिले  दुःख केवढे भयकारी मी
तेच स्वप्न मज अजून दिसते  दुस्तर नशिबी डोळ्यांनी
त्या अनाम भयदेशातील थंडाळ टेकडीवरती

निस्तेज अवेळी दृष्टीस पडले  शहनशाह अन राजकुंवर
 झाकोळलेले  मृत्यू समीप, गलितगात्र ते युद्धवीर
गिळून अवंढा एकसुराने सांगत होते ते :
 "दास्यत्वाचे दान दिले तुज कोमल हातांनी,
त्या कातळ हृदया रूप गर्विता सुंदर ललने नी"

संधीप्रकाशातून विलगले त्यांचे कातर ओठ,
भयाण सूचन करून त्यांच्या कंठाचाही खुडला देठ,
भयकंपाने मी उठलो अन पुरती उडली माझी गाळण,
स्वप्नातील त्या अनामदेशी थंड टेकडी वर मी होतो.
१०
म्हणून मी हिंडतो उदासी, दर्द धरुनी थोर उराशी,
सांगतो तुज दुःख माझे, भीड ना धरता जराशी
गवतही सुकले तळ्यातील, पक्षीही ना गात काही
त्यामुळे फिरतो भनंगी, जाळी मज अंगास लाही
【f】 शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
९५९५६८७७६४/eshivprabhat@gmail.com
©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,
सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)
जनसेवा  फौंडेशन लोणी बु संचलित
कला व वाणिज्य महाविद्यालय, शेंडी (भंडारदरा)
ता. अकोले, जि. अहमदनगर