Tuesday, October 22, 2019

इये हृदयीं चे तें हृदयीं


इये हृदयीं चे तें हृदयीं:
वनस्पती-वाङ्मयाचा 'प्रगमॅटिक' प्रवास




त्रिमितीय जीवनप्रवासातील एक महत्त्वाचं आयाम म्हणजे -गोरखनाथ जाधव. दुसरं आयाम अर्थातच नामदेवराव पवार. (इथं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करता येणार नाही. कारण'  त्या' ज्या त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ बेटर हाफ वगैरे! इथं बायकांचा विषय बाजूला ठेवला आहे कारण तो स्वतंत्र लिखाणाचा विषय होऊ शकेल!) आज त्यांच्या (त्याच्या) वाढदिवसाच्या निमित्तानं काही अज्ञात कंगोरे उजळ होत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. माझ्या(म्हणजे माझ्या बायकोच्या!) ड्रीम निओ गाडीवरील एक सदैव राखीव असलेलं सीट. आमच्यातलं बरंच काही(सर्व काही!) एकमेकांना पूरेपूर माहित. घरचे संबंधही अगदी घरच्या सारखे. कमीपणा, साधेपणा आणि मोकळेपणा यांचा मिलाफ म्हणजे गोरखनाथ जाधव(सर). समज ही उपजतंच! घरी (लासलगाव-वाकी) वारकरी-नाथपूजक कुटुंबाचा प्रदीर्घ वारसा. शेती, म्हशी, दूध, डोंगरएव्हढं काम, कांदे(किंग) त्याबरोबरच सुबत्ता आणि समृद्ध अडगळही! शेतीचा गाडा ओढणारा मोठा भाऊ(योगेशदादा) आणि वहिनी. अण्णा आणि ताई. तसेच अप्पा आणि मावशी. कृषीपूरक आदर्श वातावरण लाभलेला माणूस म्हणजे गोरखनाथ. मागच्याच वर्षी अशक्यप्राय अशी गोरखनाथगड वांबोरी-वृद्धेश्वर- मायम्बा- कानिफनाथ मोहीम यशस्वी झाली. (तसं अशक्य काही नाही परंतू बायकांना गुंगारा देऊन एकटं-एकटं (जाधव, राशीनकर आणि तक्ते तिघे तिघे एकत्र फिरलो तरी एकटं एकटं फिरतात, असा टोपारा येतोच! असो)
आपण कोठून तरी कोठे तरी जाण्यासाठीच एकत्र येत असतो. येण्याअगोदर जाणं फिक्स असतंच. आणि तेच कितीही नाही म्हटलं तरी जास्तच अस्वस्थ करणारं असतं. तरंगे वस्ती वरील (२०१४-१५) एन एस एस शिबीरात ओळख झाली. त्या नंतर घसरट वाढतंच गेली. मग सहकारी झालो. मग वार्षिक स्नेहसंमेलनात  सह-निवेदक झालो. त्यांनतर अधून मधून शिबिरात एखाद दुसरा डान्स परफॉर्मन्स! गाडीवर हरहुन्नरी मोहिमा चालूच! भंडारदरा, कळसूबाई, साम्रद, रतनगड, नगर, नाशिक, श्रीगोंदा, जामनेर, औरंगाबाद, पुणे(खडकी) जुन्नर, पारनेर, निघोज, शिरूर, आणि उरलं सुरलं बाळेश्वर वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांना नेहमीच धाक वाटायचा. पण तेवढाच आदरही! माणूस म्हणूनही खूपच सामाजिक! शिक्षक कर्मचारी पैकी कोणाचंही अडलेलं घोडं कार्यस्थळी पोहचविण्याची शंभ टक्के हमी. रात्री अपरात्री दवाखाने, मदत, धावपळ यासाठी हक्काचा माणूस. (आपला माणूस आपल्यासाठी! त्याची भरपूर व्याजासह किंमतही मोजावी लागली आहे!) पण अडल्या नडल्या वेळी हमखास उभा राहून सावरणारा हाच आपला माणूस. बहि:शाल, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक, कार्यशाळा, विशेष कार्यक्रम, मतदार जागृती कॉलेज डॉक्युमेंटरी वगैरे वगैरे.
अभय(आबा) डगळे(चिंचवणे) हा त्याचा यार. तो अडचणीत असताना त्याला कितीदा मदत करताना मी गोरखला पाहिलंय. तोच अभय भीतीनं गलबलून गेल्यावर मरणाच्या दारात असताना अस्वस्थ झालेला गोरख मी पाहिलाय. आता तर न बोलताही सर्व काही कळतं आम्हाला एकमेकांचं, एकमेकांबद्दल! माझी सामाजिक बुद्धीमत्ता वाढण्यात त्याचाच हात आहे. स्टोन, मूळव्याध आणि हायपर ऍसिडिटी सारख्या दुखण्यावर हसत हसत मात करणारा हा माणूस अवलियाच असू शकतो. आणि हेच आमच्यातील इये हृदयींचे ते हृदयीं पोचणारं वनस्पती-वाङ्मयीन प्रगमॅटीक अर्थवहन आहे.
©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
९५९४६८७७६४, eshivprabhat@gmail. com
आश्वी खुर्द, २२/१०/२०१९ १०.३४ रात्रौ